नागपूर : इंडियन प्रिमियर लीग क्रिकेट स्पर्धा सुरू होताच दिल्ली-मुंबई-नागपूरसह विदर्भातील क्रिकेट सट्टेबाज सक्रिय झाले आहेत. नागपूर-चंद्रपूर-गोंदियातील मुख्य सट्टेबाजांनी राज्यभर बनावट महादेव ॲपचे जाळे पसरवले असून दररोज लाखोंमध्ये उलाढाल सुरू असल्याची माहिती आहे. आयपीएल स्पर्धेला नुकतीच सुरुवात झाली असून अनेक सट्टेबाजांनी आपापले ‘नेटवर्क’ तयार करणे सुरू केले आहे. राजस्थानच्या जहाँगीर या क्रिकेट बुकीने सुरू केलेल्या महादेव ॲपसारखाच बनावट ॲप तयार करून सध्या सट्टेबाजी सुरू आहे. सध्या दिल्ली, मुंबईसह नागपुरातील क्रिकेट सट्टेबाजांनी छत्तीसगडच्या धर्तीवर बनावट महादेव ॲपचे जाळे विणले असून त्या माध्यमातून दररोज लाखो रुपयांची उलाढाल होत आहे.

नागपुरातील सर्वात मोठा सट्टेबाज बोमा, सिराज, पंकज कढी, राज, अलेक्झँडर, बंटी ज्यूस, परेश आणि मँगो सदरानी यांच्यासह काही सट्टेबाजांनी नागपुरातून बनावट महादेव ॲपवर खायवाडी-लगवाडी सुरू केली आहे. तसेच चंद्रपुरातील धीरज-नीरज, राजिक आणि महेश हे बनावट महादेव ॲपचे भागीदार झाले आहेत. यासह चंद्रपुरातील १६ क्रिकेट बुकींना बनावट महादेव ॲपची आयडी-पासवर्ड देण्यात आला असून त्यांच्या माध्यमातून राज्यभरातून हजारो ग्राहकांकडून कोट्यवधींमध्ये खायवाडी-लगवाडी करण्यात येत आहे. यासोबतच काही बुकी अमरावती, गोंदिया, भंडारा आणि अकोल्यात बसून नागपूर आणि चंद्रपुरातील क्रिकेट बुकींसाठी खायवाडी-लगवाडी करीत असल्याची माहिती आहे. मात्र, नागपूर-चंद्रपूरसह अन्य जिल्ह्यातील पोलीस या क्रिकेट बुकींवर कारवाई न करता मौन बाळगत आहेत.

हेही वाचा : नागपूर : गांजा पिण्यावरून वाडीत युवकाचा भोसकून खून

काही पोलीस कर्मचारी या क्रिकेट बुकींच्या संपर्कात असून ‘कॉल रेकॉर्ड’ काढल्यास अनेक पोलीस कर्मचाऱ्यांचे पितळ उघडे पडण्याची शक्यता आहे. आयपीएल अंतिम टप्प्यात आल्यानंतर क्रिकेट सट्टेबाजीला आणखी ज्वर चढते. विदर्भातील सट्टेबाज राज्यातच नव्हे तर आंध्रप्रदेश, छत्तीसगड आणि मध्यप्रदेशातीही क्रिकेट सट्टेबाजीची खायवाडी-लगवाडी करण्याच्या तयारीत असतात, अशी माहिती आहे.

लहान सट्टेबाजही ‘आयडी’च्या प्रेमात

नागपूर आणि चंद्रपुरातील मोठमोठे सट्टेबाजांनी त्यांचे ‘नेटवर्क’ नसलेल्या शहरात लहान सट्टेबाजांना त्यांची ‘आयडी’ दिली आहे. चंद्रपुरातील निरज-धीरज आणि नागपुरातील बोमा-राज यांनी सट्टेबाजी खेळण्यासाठी अनेकांना आपापली आयडी दिली आहे. लहान सट्टेबाज क्षमतेपेक्षा जास्त रक्कमेवर जुगार खेळू शकत नाही. त्यामुळे मोठ्या सट्टेबाजांकडून आयडीच्या माध्यमातून मोठ्या रकमेची खायवाडी-लगवाडी करण्यात येत असल्याची माहिती आहे.

हेही वाचा : नागपुरात होळीत मद्यपींचा रस्त्यावर हैदोस; दोघांचा मृत्यू, शंभरावर…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सट्टेबाजीचा हवालाद्वारे व्यवहार

क्रिकेट सट्टेबाजीतून रोज कोट्यवधींची उलाढाल होत असते. हा सर्व व्यवहार ऑनलाईन किंवा पेमेंट ॲपवरून केल्यास पोलिसांच्या रडारवर येण्याची भीती असते. त्यामुळे क्रिकेट सट्टेबाजीतील हार-जीतचा व्यवहार हवालाच्या माध्यमातून केल्या जातो. कोणत्याही शहरात हवालाच्या माध्यमातून पैशाची देवाण-घेवाण करण्यात येत असल्याची माहिती आहे.