लोकसत्ता टीम

नागपूर: केंद्रीय शिक्षण मंत्रालयाद्वारे जाहीर करण्यात आलेल्या २०२३ च्या नॅशनल इन्स्टिट्युशनल रँकिंग फ्रेमवर्कमध्ये (एनआयआरएफ) राज्यातील एकही विद्यापीठ देशातील पहिल्या दहामध्ये स्थान मिळवू शकले नाही. बंगळुरूच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सने देशातील १०० विद्यापीठांमध्ये पहिला क्रमांक पटकावला आहे. मुंबई येथील होमी भाभा नॅशनल इन्स्टिट्यूटने १७ वा, तर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने १९ वा क्रमांक मिळवत पहिल्या २० मध्ये स्थान मिळवले.

दरवर्षी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाद्वारे देशातील प्रमुख विद्यापीठांसह १० वेगवेगळ्या प्रवर्गातील महाविद्यालयांची रँकिग जाहीर केली जाते. त्यानुसार अध्यापन, अध्ययन, संशोधन, आकलन, व्यावसायिक शिक्षण, अभ्यासक्रमांची परिणामकारकता, आदी निकषांनुसार महाविद्यालयांची क्रमवारी जाहीर केली जाते. केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री राजकुमार रंजन सिंह यांनी यंदाच्या वर्षाची ‘एनआयआरएफ’ रँकिंग जाहीर केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पहिल्या शंभरमध्ये राज्यातील कोणती विद्यापीठे?

विद्यापीठ क्रमवारीत होमी भाभा नॅशनल इन्स्टिट्यूट मुंबई- १७, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ- १९, इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नोलॉजी मुंबई- २३, सिम्बयोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठ पुणे- ३२, दत्ता मेघे इन्स्टिट्यूट ऑफ हायर एज्युकेशन ॲण्ड रिसर्च वर्धा- ३९, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ पुणे- ४६, नर्सी मोंजी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज मुंबई- ४७, मुंबई विद्यापीठ- ५६, भारती विद्यापीठ पुणे- ९१, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स मुंबई- ९८.