नागपूर : शेतातल्या पिकांना श्री सूक्त मंत्रोच्चार ऐकवल्याने सोयाबीन उत्पादनात वाढ होते. धापेवाडातील शेतीत आम्ही हा प्रयोग यशस्वी केल्याचा अनुभव केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांच्या पत्नी आणि सामाजिक कार्यकर्त्या कांचन गडकरी यांनी मंगळवारी येथे सांगितला.
देशातील हरितक्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त वसंतराव नाईक प्रतिष्ठान आणि वनराई फाऊंडेशनतर्फे प्रयोगशील शेतकरी पुरस्काराने कांचन गडकरी यांचा एन्रिको हाईट्स सभागृहात सत्कार झाला. यावेळी त्या बोलत होत्या. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोलाचे कुलगुरू डॉ. शरदराव गडाख, शेती शास्त्रज्ञ डॉ. सी. डी. मायी, वसंतराव नाईक प्रतिष्ठानचे अध्यक्ष माजी आमदार अॅड. निलय नाईक प्रामुख्याने उपस्थित होते. वनराई फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. गिरीश गांधी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
बियाणे पेरल्यापासून धर्मसंस्कार केला तर शेती देखील भरघोस उत्पादन देते, असे सांगत गडकरी म्हणाल्या, माती आणि माता यात फक्त एका वेलांटीचा फरक आहे. दोघांनाही निसर्गाने नवनिर्मितीचे वरदान दिले आहे. शेतीला संस्काराच्या बिजारोपणाची जोड दिली, तर शेती फुलते. श्री सुक्त हे केवळ अध्यात्म नाही, तर ती एक थेरेपी दखील आहे. पीकांना संगीत ऐकवले तर एकरी उत्पादन वाढते. पाणी, माती आणि कीड व्यवस्थापन ही शेतीची त्रिसुत्री आहे. पहिल्या प्रयत्नांत अपयशाचा धोका असतो. मात्र प्रयोगातून अनुभव मिळतो आणि अनुभवातून चुका कळतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी प्रयोगशीलतेची कास धरताना जुन्या आणि नव्या तंत्राची सांगड घातली पाहिजे. सरकारी योजना तळागाळातल्या अल्पभूधारकांपर्यंत पोचल्या तर निश्चित शेतीला सुगीचे दिवस येतील, असेही गडकरी म्हणाल्या.
डॉ. देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. गडाख म्हणाले, वसंतराव नाईकांच्या दूरदृष्टीमुळे आज भारत अन्नधान्याच्या बाबतीत नुसता स्वयंपूर्णच नाही, तर इतर राष्ट्रांचीही भूक भागवत आहे. रोजगार हमी, कापूस एकाधिकार, बियाणे महामंडळासोबतच संकरीत वाणाचेही प्रणेते असलेल्या नाईकांनी दूध, फळांच्या उत्पादनातही राष्ट्राला स्वयंपूर्ण बनविले आहे.
गडकरी कुटुंबाकडून लोकसंग्रहाची नाळ कायम
वनराई फाऊंडेशन अध्यक्ष डॉ. गांधी म्हणाले, सार्वजनिक जीवनात टीका, चेष्टेचा धनी होऊनही गडकरी कुटुंबाने लोकसंग्रह आणि प्रयोगशीलतेशी नाळ तोडली नाही. शेतीत कष्टाला पर्याय नाही. त्यामुळे उंटावर बसून शेती होत नाही, हे पक्के ठाऊक असल्याने कांचन गडकरींनी शेती, सार्वजनिक जीवन आणि कुटुंबाचा समतोल साधत आदर्श व्यवस्थापनाचा वस्तूपाठ घालून दिला आहे.