भंडारा : पवनी तालुक्यातील सावरला येथील जंगल शिवारात वाघाने गुराख्यावर हल्ला केला. यात गुराख्याचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळी घडली. या घटनेनंतर जंगलाशेजारील गावांमध्ये भीतीचे वातावरण आहे. कुसन आत्माराम अवसरे (५५, रा. देऊळगाव, ता. ब्रम्हपुरी, जि. चंद्रपूर) असे मृत गुराख्याचे नाव आहे.

सावरला हे गाव चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेवर आहे. रविवारी सकाळच्या सुमारास सिमेवरील देऊळगाव येथील कुसन अवसरे हे गुरे चारण्यासाठी सावरला व देऊळगावच्या सिमेवरील जंगलात गेले होते. यावेळी वाघाने त्याच्यावर हल्ला केला. यात कुसन यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती पवनी पोलीस ठाणे व वनविभागाला देण्यात आली. पुढील कारवाई पवनी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रीतम येवले करीत आहेत.

हेही वाचा – बुलढाणा : गुन्हेगाराचा तलवारीने वार, पोलिसांनी केला गोळीबार!

वीज कोसळल्याने शेतकऱ्याचा मृत्यू

मुसळधार पावसासह अचानक वीज कोसळल्याने एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला. ही घटना मोहाडी तालुक्यातील सातोना येथे रविवारी घडली. योगेश गजानन हटवार (३६, रा. रोहना खुर्द) असे मृताचे नाव आहे. योगेश हा सातोना येथील शेतशिवारात काम करीत होता. दरम्यान दुपारी अचानक वीज कोसळून त्याचा मृत्यू झाला.

हेही वाचा – “बच गयी मैं, तो जला हीं क्‍या…”, नवनीत राणांचे बच्‍चू कडूंवर पुन्हा शरसंधान

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भिंत कोसळल्याने ४ शेळ्यांचा मृत्यू, तर ५ जखमी

लाखांदूर तालुक्यातील तई खुर्द गावात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे एका शेतकऱ्याच्या घराची भिंत कोसळली. या घटनेत ४ शेळ्यांचा जागीच मृत्यू झाला तर ५ शेळ्या गंभीर जखमी झाल्याची घटना १ सप्टेंबर रोजी पहाटे ५ च्या सुमारास घडली. आशीष कोल्हे रा. तई/खुर्द असे पशुपालकाचे नाव आहे. त्यांचे सुमारे ४० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. आशीष हा अल्पभूधारक शेतकरी असून शेळीपालनाचा व्यवसाय करतो. या व्यवसायातून तो आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असून शासनाकडे नुकसान भरपाईची मागणी केली आहे.