Maharashtra Rainfall Forecast October 2025 / नागपूर : संपूर्ण देशातून येत्या २४ तासात मान्सून माघार घेण्याचा अंदाज हवामानखात्याकडून व्यक्त करण्यात आला आहे. मान्सूनच्या परतीची सीमा कारवार, कलबुर्गी, निजामाबाद, कांकेर, चांदबली दरम्यान आहे. मात्र, भारतातील अनेक राज्यात पावसाचा धुमाकूळ मात्र सुरूच आहे. आता तर भारतीयांची दिवाळीसुद्धा पावसातच जाणार असल्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.

महाराष्ट्रात यंदा मान्सूनचा हंगाम १४१ दिवसांचा राहिला आहे. जवळजवळ संपूर्ण महाराष्ट्रातून मान्सूनने माघार घेतली आहे. राज्यात उन्हाचा चटका वाढत असतानाच सायंकाळच्या सुमारास थंडीची चाहूल देखील लागत आहे आणि आता पावसासाठी पोषक हवामान तयार झाले आहे. बुधवारी राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांसह पावसाचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे.

आज, बुधवारी कोकणातील रत्नागिरी, सिंधूदुर्ग मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभाणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव जिल्ह्यात काही ठिकाणी विजांसह पावसाचा अंदाज आहे. ठाणे, रायगड, जळगाव, नाशिक या जिल्ह्यात देखील तुरळक ठिकाणी पावसाच्या हलक्या सरीचा अंदाज देण्यात आला आहे. उर्वरित राज्यात मात्र कोरडे हवामान कायम असणार आहे आणि उन्हाचा चटका देखील कायम राहण्याची शक्यता आहे.

गुरुवारी कोकणातील सिंधूदुर्ग, रायगड, मध्य महाराष्ट्रातील धुळे, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धाराशिव जिल्ह्यात काही ठिकाणी विजांसह पावसाचा अंदाज आहे. नांदेड, हिंगोली, परभणी, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, नंदुरबार, सिंधुदुर्ग, मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यात देखील तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

शुक्रवारी पालघर आणि नाशिक जिल्ह्यात विजांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर ठाणे, मुंबई, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या सरीची शक्यता आहे.

नैऋत्य बंगालच्या उपसागरातील चक्राकार वाऱ्याची स्थिती कोमोरीन भागाकडे येणार असल्याने लक्षद्वीप, केरळ, दक्षिण कर्नाटकच्या किनाऱ्यालगत रविवारपर्यंत कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत आहेत. त्यामुळे पावसाला पोषक स्थिती निर्माण झाली आहे.

महाराष्ट्रात सध्या काही भागात ऑक्टोबर हीट सारखी स्थिती, काही भागात थंडीची चाहूल तर काही भागात मात्र पाऊस अशी हवामानाची तिहेरी स्थिती निर्माण झाली आहे.