अकोला : मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० अंतर्गत बार्शीटाकळी तालुक्यातील रेडवा येथे दोन आणि भेंडीमहाल येथे १० मेगावॉट सौर प्रकल्प उभारण्यात आले आहेत. या प्रकल्पाचे लोकार्पण नुकतेच मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. या प्रकल्पांमुळे परिसरातील अडीच हजारांवर शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध होईल. आतापर्यंत उभारलेल्या सौर ऊर्जा प्रकल्पामुळे जिल्ह्यातील १४ हजार कृषिपंपांना दिवसा वीज पुरवठा होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला.
शेतकऱ्यांना दिवसा आणि शाश्वत वीज पुरवठा करण्यासाठी महत्वाकांक्षी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० अंतर्गत राज्यात विकेंद्रीत सौर प्रकल्प उभारून १६ हजार मेगावॉट वीज निर्मिती केली जात आहे. या योजनेंतर्गत बार्शीटाकळी तालुक्यात रेडवा सौर प्रकल्प दोन मेगावॉट आणि भेंडीमहाल सौर प्रकल्पातून १० मेगावॉट हरित ऊर्जा निर्माण होणार आहे. या दोन्ही प्रकल्पामुळे बार्शीटाकळी तालुक्यातील दगडपारवा, कान्हेरी, रेडवा, धाबा, बार्शीटाकळी, पातुर नंदापूर, महान, महागाव, बहिरखेड, घोटा आदी गावातील दोन हजार ५९५ शेतकऱ्यांच्या कृषिपंपांना दिवसा आणि पूर्ण दाबाने वीज पुरवठा होईल. लोकार्पण कार्यक्रमाला महावितरणचे मुख्य अभियंता राजेश नाईक, अधीक्षक अभियंता प्रतीक्षा शंभरकर, कार्यकारी अभियंता अजितपालसिंह दिनोरे, गोरक्षनाथ सपकाळे, अनिल उईके, शशांक पोंक्षे आदी उपस्थित होते.
१० सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित
मुख्यमंत्र्यांनी तेल्हारा तालुक्यातील मनात्री आणि अकोट तालुक्यातील अकोलखेड या दोन ठिकाणी प्रत्येकी १० मेगावॉट क्षमतेच्या सौर प्रकल्पांचे भूमिपूजन केले. या प्रकल्पांमुळे परिसरातील दीड हजार शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळेल. जिल्ह्यात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेमध्ये आतापर्यंत १० सौर प्रकल्प कार्यान्वित करण्यात आले असून ५० मेगावॉट ऊर्जा निर्मिती केली जात आहे. या प्रकल्पामुळे जिल्ह्यातील १४ हजारापेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या कृषिपंपांना दिवसा विजेची सुविधा निर्माण झाली.
सुरळीत वीज पुरठ्यासाठी दोन उपकेंद्र
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मूर्तिजापूर तालुक्यातील ३३ केव्ही हिवरा कोरडे आणि ३३ केव्ही पारद या दोन उपकेंद्राचे भूमिपूजन करण्यात आले. प्रणाली मजबुतीकरण योजनेंतर्गत प्रत्येकी ५ एम.व्ही.ए. क्षमता असलेल्या आणि ६.४८ कोटी खर्च करून उभारण्यात येत असलेल्या महावितरणच्या या दोन उपकेंद्रामुळे माना, हिवरा कोरडे, शेलूबाजार, सोनोरी, बपोरी, पोटा, कवठा, खोलापूर, येंडली, पिंगळा, नवरंगपूर, मंडूरा, बल्लारखेड, भटोरी, सांगवामेळ, पारद, चुंगशी, मुंगशी, विहीरवाडा, दताळा आदी गावांना सुरळीत वीज पुरवठा होईल.