नागपूर : नागपूर जिल्हा व सत्र न्यायालयाच्या नव्या इमारतीत सोमवारी वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे दिवसभर वकिलांना आणि पक्षकारांना नाहक त्रास सहन करावा लागला. एका वर्षापूर्वीच जिल्हा न्यायालयाच्या या इमारतीचे उद्घाटन झाले होते. नऊ माळ्याच्याा या नव्या इमारतीमध्ये वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे ‘लिफ्ट’ बंद पडल्या. यामुळे सर्वात वरच्या माळ्यावर पोहोचण्यासाठी वकिलांची दमछाक झाली. दुसरीकडे, वीज खंडित झाली असली तरी न्यायलयीन कामकाज नियमित सुरू असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.

प्राप्त माहितीनुसार, सोमवारी दिवसभर जिल्हा न्यायालयातील वीज पुरवठा खंडित राहिला. वीज पुरवठा खंडित होण्यामागे कारण स्पष्ट झाले नसून वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न सुरू होते. मात्र, यामुळे नागपूरच्या तीव्र उन्हाळ्यात वरच्या माळ्यावर पोहोचण्यासाठी वकिलांना घाम गाळावा लागला. नागपूरच्या जिल्हा न्यायालयात सुमारे दहा हजार वकिलांचे येणे-जाणे सुरू असते. याशिवाय जिल्हा न्यायालयात मोठ्या संख्येत आरोपी,प्रतिवादी येत असतात. सोमवारच्या घटनेचा फटका सर्वांना सहन करावा लागला. अनेक वकिलांनी याची तक्रार केली, मात्र सायंकाळपर्यत वीज पुरवठा पूर्ववत झालेला नाही. डिस्ट्रिक्ट बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड.रोशन बागडे यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. वीज पुरवठा बंद झालेल्या प्रकरणाची तक्रार मुख्य जिल्हा न्यायाधीश यांच्याशी करणार असल्याचे ॲड.बागडे यांनी सांगितले. उल्लेखनीय आहे की केवळ एका वर्षाआधी जिल्हा व सत्र न्यायालयाच्या या नव्या इमारतीचे उद्घाटन झाले होते.

हेही वाचा : “सुप्रिया सुळे घरातील वादात अडकल्याने काहीही बोलतात”, गोव्याचे मुख्यमंत्री म्हणाले…

सर्वोच्च न्यायालयाचे न्या.भूषण गवई यांच्या हस्ते मार्च २०२३ मध्ये या नव्या विस्तारीत इमारतीचे उद्घाटन झाले होते. जिल्हा न्यायालयाच्या प्रत्येक माळ्यावर १९ हजार चौरस फुटाची प्रशस्त जागा आहे. सुमारे दीड हजार दुचाकी आणि १०७ चारचाकी वाहनाच्या पार्किंगची सोय येथे करण्यात आली आहे. सोमवारी वीजपुरवठा खंडित झाल्याने इमारतीतील मूलभूत प्रश्नांकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले.

हेही वाचा : “लोकसभेच्या ४८ जागांवर काँग्रेस, भाजपकडून मुस्लिमांना प्रतिनिधीत्वच नाही”, वंचितचे उमेदवार अब्दुल रहमान यांची टीका

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उच्च न्यायालयातही गेली होती वीज

मागील आठवड्यात शुक्रवारी दुपारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात काही काळासाठी वीज पुरवठा खंडित झाला होता. तांत्रिक कारणांमुळे वीज गेली असल्याची माहिती तेव्हा दिली गेली. उच्च न्यायालयातील वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी प्रशासनाने तातडीचे प्रयत्न करून पुरवठा पूर्ववत केला होता. उन्हाळाच्या दिवसांमध्ये वीजपुरवठा खंडित झाल्याने उच्च न्यायालयात अनेक वकीलांनी नाराजी व्यक्त केली होती.