नागपूर : गुलशननगर येथील दि मातोश्री शोभाताई भाकरे मतिमंद मुला-मुलींची निवासी शाळा व कर्मशाळा येथील कर्मचारी समस्यांमुळे अडचणीत आहेत. संस्थाचालकांच्या धोरणामुळे शाळा कधीही बंद पडून कर्मचाऱ्यांवर उपासमारीची पाळी येऊ शकते. त्यावर त्वरित उपाय म्हणून शाळेवर प्रशासक नेमण्यात यावा, अशी मागणी आमदार संदीप जोशी यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

यासंदर्भात आ. जोशी यांनी १२ जून रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून संबंधित शाळेतील समस्यांचा पाढाच वाचला आहे. मागील १० ते १५ वर्षांपासून शाळेत २६ कर्मचारी कार्यरत आहेत. संस्थेच्या कारभारात अकार्यक्षमता, अपारदर्शकता तसेच शिक्षक कर्मचाऱ्यांवर अन्यायाच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. नियमित मानधन, वेतन इत्यादींबाबत अनेक समस्या आहेत. संस्थेने काढलेले कर्ज फेडण्याकरिता संस्थाचालकांकडून कर्मचाऱ्यांना दरमहा एक हजार रुपयांची मागणी केली जाते. शाळेत ३५ तर कर्मशाळेत ३८ विद्यार्थी आहेत. मात्र संस्थाचालकांच्या धोरणामुळे शाळा कधीही बंद पडून कर्मचाऱ्यांवर उपासमारीची पाळी येऊ शकते. या गंभीर बाबी लक्षात घेता संस्थेवर नियंत्रण ठेवण्यासाठी त्वरित प्रशासक नियुक्त करावा, अशी मागणी आमदार जोशी यांनी पत्रातून केली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या मागणीची दखल घेत माजी शिक्षक आमदार व महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे राज्य कार्याध्यक्ष नागो गाणार यांनी देखील ३० जून रोजी अपंग कल्याण विभागाचे मंत्री अतुल सावे आणि आयुक्त प्रवीण पुरी यांना पत्र पाठवले. त्यांनीही संस्थेची परिस्थिती अत्यंत बिकट असून शिक्षक व कर्मचाऱ्यांवर दबाव टाकत धमकी देण्यात येत असल्याचे नमूद केले. त्यांनी देखील प्रशासकाची तात्काळ नियुक्ती करण्याची गरज अधोरेखित केली.
दि मातोश्री शोभाताई भाकरे निवासी शाळेतील व्यवस्थापनाबाबत दीर्घकाळापासून अनेक तक्रारी असून, शासनाने याची गांभीर्याने दखल घेऊन संबंधित ठिकाणी योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी संबंधित पत्रांद्वारे करण्यात आली आहे.