यवतमाळ : पर्यावरण संवर्धन व प्रदूषण निर्मूलनाच्या संदेशासाठी राज्यभरातील ८५ पेक्षा अधिक सायकलस्वारांनी यंदा चौथ्या वर्षी ‘सायकल वारी’ उपक्रमांतर्गत रविवारी नागपूरहून पंढरपूरकडे प्रस्थान केले. १३ ते ८४ वयोगटातील सायकल रायडर्स या मोहिमेत सहभागी झाले असून, रविवारी यवतमाळात मुक्काम केल्यानंतर सोमवारी सकाळी ही वारी यवतमाळातील सायकलस्वारांसह पंढरपूरकडे रवाना झाली.

या उपक्रमात भंडारा, गोंदिया, नागपूर, वर्धा, यवतमाळ, आर्णी, नांदेड, उदगीरसह राज्यातील ९० हून अधिक ‘सायकलिंग क्लब’ सहभागी होत असून, ही सायकल वारी पारंपरिक वारीप्रमाणे निघाली आहे. पंढरपूर येथे २२ जूनला या सायकल वारीचा समारोप होणार असून, त्यावेळी देशभरातून आलेले सायकलपटू सायकल रिंगण सोहळा साजरा करणार आहेत. पंढरपूरला येणाऱ्या इतर पारंपरिक रिंगण सोहळ्याप्रमाणे हा रिंगण सोहळा असेल, अशी मााहिती या सायकल वारीचे संयोजक तथा टायगर ग्रुप ऑफ अ‍ॅडव्हेंचर, नागपूर या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रवींद्र तरारे यांनी दिली.

या मोहिमेची सुरुवात चार वर्षांपूर्वी केवळ दोन सायकलपटू वारकऱ्यांपासून झाली होती. दुसऱ्या वर्षी १३, तिसऱ्या वर्षी ३२ आणि यंदा ८५ सायकलस्वारांनी सहभाग नोंदवून उपक्रमाच्या यशात भर घातली आहे. विशेष म्हणजे यंदा आठ महिला सायकलस्वारही सहभागी झाल्या आहेत. यामध्ये अर्चना बोनगिलवार, निता कुंटेवार (यवतमाळ), योगी बरडे (नागपूर) आदी महिला रायडर्सचा सहभाग उल्लेखनीय आहे.

‘सायकल चालवा – आरोग्य वाचवा’ हा संदेश घेऊन निघालेल्या या पथकास पायलट वाहनाची साथ असून, त्यात पाण्याची सुविधा, सायकल पंक्चर दुरुस्ती साहित्य, कार्डियाक अटॅकसाठी आवश्यक उपचारसामग्रीसह दोन डॉक्टरांची व्यवस्था करण्यात आली आहे. परतीच्या प्रवासासाठी दोन ट्रॅव्हल्स बसचेही नियोजन करण्यात आले आहे. टायगर ग्रुप ऑफ अ‍ॅडव्हेंचर, नागपूर या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रवींद्र तरारे, कोषाध्यक्ष अतुल तपासे व सचिव प्रसाद देशपांडे हे या उपक्रमाचे नेतृत्व करत आहेत. याशिवाय रामटेक सृष्टी सौंदर्य बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष ऋषिकेश किंमतकर, तसेच टायगर सिटी सायकलिंग क्लब नागपूरचे दिलीप वरकड यांचेही मोलाचे योगदान लाभले आहे. या उपक्रमामुळे पर्यावरण संरक्षण, आरोग्य जागृती आणि एकात्मतेचा संदेश राज्यभर पोहोचवला जात असल्याचे या वारीत सहभागी सायकलपटूंनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दिव्यांग वारीसोबत रिंगण

यवतमाळातून रविवारी दृष्टीहिनांचा सहभाग असलेली दिव्यांगांची वारी पंढरपूरकडे रवाना झाली. सोमवारी सकाळी स्थानिक संघ कार्यालयातून नागपूरहून आलेल्या व यवतमाळातील सायकलपटूंचा सहभाग असलेली सायकल वारीही पंढरपूरकडे रवाना झाली. भांबराजा ते आर्णी दरम्यान या दोन्ही वारकऱ्यांची गळाभेट झाली आणि दिव्यांगांसोबत सायकलपटूंनी अनोखा रिंगण सोहळा अनुभवला. सामाजिक भान ठेवत निघालेल्या या दोन्ही वारींचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.