गोंदिया : केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आठवडाभरापूर्वी रिवा-पुणे-रिवा, जबलपूर-रायपूर व भोपाळ-बंगळूर या तीन रेल्वे लवकरच सुरू करण्याची घोषणा केली होती.

त्यापैकी आता रिवा-पुणे-रिवा या रेल्वेचे संभाव्य वेळापत्रक रेल्वे विभागाने जाहीर केले आहे. ही रेल्वे सध्या आठवड्यातून एक दिवस (दर मंगळवारी) धावणार आहे. यामुळे महाराष्ट्रासह मध्यप्रदेशातील प्रवाशांना सुद्धा मोठा दिलासा मिळाला आहे.

हावडा-मुंबई मार्गावरील गोंदिया रेल्वे स्थानक हे महत्त्वपूर्ण स्थानक म्हणून ओळखले जाते. या रेल्वे स्थानकावरून दोन्ही दिशेला ४९ वर मेल, एक्सप्रेस, लोकल, पॅसेंजर गाड्या धावतात. तर दररोज दहा हजारांवर प्रवासी गोंदिया रेल्वे स्थानकावरून प्रवास करतात. हे रेल्वे स्थानक मध्यप्रदेश आणि छत्तीसगड राज्याला लागून असल्याने प्रवाशांना सुद्धा या रेल्वे स्थानकाची मदत होते. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी गेल्या आठवडचात या मार्गावर तीन रेल्वे गाड्या सुरू करण्याची घोषणा केली होती. त्यापैकी रिवा-पुणे-रिवा या रेल्वे गाडीचे संभाव्य वेळापत्रक रेल्वे विभागाने जारी केले आहे.

रिवा-पुणे-रिवा या गाडीला २०१५२ व २०१५१ हा क्रमांक दिला आहे. ही गाडी दर मंगळवारी सकाळी ६:४५ वाजता रिवा रेल्वे स्थानकावरून पुणे साठी सुटेल. यानंतर सकाळी ७:३८ वाजता सतना, मैहर ८:१७, कटनी ९:२५ , जबलपूर सकाळी ११:०४ वाजता, मदनमहल सकाळी ११:०७, नैनपूर दुपारी १:३४ वाजता, बालाघाट दुपारी ३:१५ वाजता, गोंदिया दुपारी ४:०१ वाजता, नागपूर सायंकाळी ६:२० वाजता व पुणे येथे दुसऱ्या दिवशी सकाळी ९:४५ वाजता पोहचेल.

त्यानंतर हीच गाडी पुणे येथून बुधवारी दुपारी ३:१५ वाजता रिवासाठी रवाना होईल. गुरुवारी पहाटे ५:२५ वाजता नागपूर, गोंदिया सकाळी ७:४५ वाजता, बालाघाट ८:४६ वाजता, नैनपूर १०:१८ वाजता, मदनमहल दुपारी १२:४३ वाजता, जबलपूर दुपारी १२:४७ वाजता, कटनी दुपारी २:३५ वाजता, मैहर दुपारी ३:५० वाजता, सतना ४:३२ वाजता व रिवा येथे सायंकाळी ५:३० वाजता पोहचेल. या घोषित तीन पैकी उर्वरित दोन गाड्यांचे वेळापत्रक सुध्या लवकरच जाहीर करणार असल्याचे सांगितले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आता जबलपूर-रायपूर वंदे भारतची प्रतीक्षा

जबलपूर-रायपूर दरम्यान आठवड्यातून सहा दिवस वंदे भारत ट्रेन सुरु करण्यात येणार आहे. या गाडीचे सुध्दा संभावित वेळापत्रक तयार झाले आहे. ही गाडी जबलपूर येथून पहाटे ५:१२ वाजता सुटेल यानंतर ही गाडी सकाळी ९:१० वाजता गोंदिया आणि ११:५५ वाजता रायपूर पोहचेल. तर रायपूर हून दुपारी १:३० वाजता सुटेल आणि गोंदियाला दुपारी ३:५५ वाजता व जबलपूरला रात्री ८:१५ वाजता पोहचणार आहे. मात्र ही गाडी नेमकी केव्हापासून सुरु होणार हे रेल्वे विभागाने अद्याप जाहीर केलेले नाही. त्यामुळे या गाडीची सुध्दा प्रवाशांना प्रतीक्षा आहे.