यवतमाळ : गेल्या आठवड्यापासून सुरु असलेल्या संततधार पावसाने तीन दिवसांपासून उघडीप दिली. त्यामुळे खुरपणीच्या कामांनी वेग घेतला. पावसामुळे अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे. संततधार पावसामुळे जिल्ह्यात अडीच हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.
यंदा नियोजित वेळापत्रकानुसार लवकर पावसाचे आगमन झाले. जूनमध्ये मृग नक्षत्र कोरडे गेले. त्यांनतर मात्र कमी अधिक प्रमाणात सुरु असलेल्या पावसाने जुलैच्या पहिल्या आठवड्यात चांगलाच वेग घेतला. सोमवारपासून धो-धो बरसणाऱ्या पावसाने गुरुवारी उसंत घेतली, ती आजही कायम आहे. शेतीच्या दृष्टीने पाऊस हितकारक जरी ठरत असला तरी शिवारात प्रचंड तण वाढले आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग खुरपणीच्या कामात व्यस्त आहे.
जिल्ह्यात ९ लाख १५ हजार हेक्टरवरील पेरण्या आटोपल्या असून, यापैकी ५ लाख हेक्टरवर कपाशीची लागवड करण्यात आली आहे. अनेक शेतकऱ्यांवर मात्र दुबार पेरणीची वेळ आली आहे. काही भागात कपाशी चिंताजनक असली तरी सोयाबीनची स्थिती मात्र चांगली आहे. पुढील काही दिवसात पावसाचा जोर वाढणार असून त्यादृष्टीने पिकांचे संरक्षण करण्यासाठी शेतकरी कामी लागल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात गेल्या आठवड्यातील पावसाने कळंब, बाभुळगाव तालुक्यातील शेती पिकांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे.
यावर्षीच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांच्या माथी बोगस बीटी बियाणे थोपविण्यासाठी अनधिकृत विक्रेत्यांनी नामांकित कंपनीच्या नावाचा वापर सुरू केला आहे. विक्रीसाठी स्थानिकांची मदत घेतली जात आहे. एचटीबीटी या बोगस बियाणाच्या विक्रीसाठी अनधिकृत विक्रेत्यांकडून विविध क्लुप्त्या लढविल्या जात आहे. बोगस बियाणे विक्रीमध्ये अनेकांचा समावेश असून गावातील सुशिक्षित बेरोजगारांना आणि शेतकऱ्यांना हाताशी धरून ही विक्री होत आहे. काही दिवसांपूर्वी १५ लाखांचे बियाणे आणि खत पकडल्या गेले. बियाणे विक्रीतून शेतकऱ्यांची फसवणुकीचा धोका आजही कायम आहे.
पावसाचा अंदाज असा…
यवतमाळ जिल्ह्यासह आसपासच्या परिसरात आज रविवारपासून ते पुढील आठवड्यापर्यंत हलका, मध्यम आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची चिन्हे आहेत. १३ ते १५ जुलैदरम्यान अर्ध्या दिवसात ढगाळ वातावरण मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे, तर १६ ते १९ दरम्यान विजांचा कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.