नागपूर : राज्यभरातील गरीब घरच्या तरूणींना झटपट पैसे कमविण्याचे आमिष दाखवून ‘सेक्स रॅकेट’ ओढणारी टोळी नागपुरात कार्यरत होती. ती टोळी तरुणींचे करारपद्धतीने लग्न लावून त्यांच्याकडून देहव्यापार करवून घेत होती. या टोळीचा उलगडा गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी तस्करी प्रतिबंधक पथकाने लावला. या टोळीतील १० पैकी ३ महिलांसह ६ आरोपींना पोलिसांनी अटक केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा…अमरावती : सुपारी देऊन जावयावर जीवघेणा हल्ला; मुलीने आंतरजातीय विवाह केल्याचा राग

शहरातील काही तरुणी अचानक बेपत्ता होत होत्या तसेच काही तरुणींचे थेट परराज्यात नोकरीनिमित्त जाण्याचे प्रमाण वाढले होते. त्यामुळे अनैतिक मानवी तस्करी प्रतिबंधित पथकाच्या प्रमुख रेखा संकपाळ यांच्या पथकाने तपास सुरु केला होता. काही गरीब घरच्या तरुणींना लवकरात लवकर पैसे कमविण्याचे आमिष दाखवून जाळ्यात ओढणारी टोळी कार्यरत असल्याचे लक्षात आले. त्यांना ‘वॉच’ ठेवून एका टोळीचा उलगडा केला. या टोळीची म्होरक्या नंदा पौनीकर आणि गीता गोयल यांनी काही तरुणींना थेट राजस्थान, ओडिशा, मध्यप्रदेश, गुजरातमध्ये बनावट लग्न लावून देऊन सेक्स रॅकेटमध्ये ढकलल्याची माहिती समोर आली. या टोळीचा सखोल तपास केला असता नागपुरातील एका विवाहित महिलेला नोकरी देण्याच्या बहाण्याने गुजरातमध्ये नेऊन चौघांशी लग्न लावून देऊन विक्री केल्याची घटना समोर आली.

या प्रकरणी एएचटीयू पथकाने तब्बल १० जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्यापैकी नंदा पौनिकर (कांजीहाऊस चौक), गीता गोयल (खंडवा, इंदोर), गंगा गुरुचरण सिद्धू (सुराबर्डी), रितू बंगाली ऊर्फ रेखा खमारी (ओडीशा), प्रतीक ऊर्फ मनोज खिमजीभाई चादरा (जामनगर, गुजरात), अंकित चंदू ऊईके (इंदिरा मातानगर) यांना अटक केली. तर अन्य चार आरोपी अद्याप फरार आहेत. त्या आरोपींचा शोध गुन्हे शाखा घेत आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त डॉ. रविंद्रकुमार सिंघल, अप्पर आयुक्त संजय पाटील, गुन्हे शाखेचे उपायुक्त अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनात एएचटीयूच्या प्रमुख सहायक निरीक्षक रेखा संकपाळ, वैभव बारंगे, गजेंद्र ठाकूर, सुनील वाकडे, दीपक बिंदाने, श्याम अंगथुलेवार, विलास विंचूरकर, अश्विनी खोपडेवार, शरीफ शेख यांनी केली.

हेही वाचा…गडचिरोली : उद्योगांसाठी जमीन दिल्यावर आम्ही जायचे कुठे? भूसंपादनावरून शेतकऱ्यांमध्ये खदखद

तरुणींची देहव्यापारासाठी विक्री

राज्यभरातील गरीब तरुणींना जाळ्यात ओढल्यानंतर टोळी त्यांना कंत्राट पद्धतीने लग्न लावून देते. त्यामुळे बलात्काराचा गुन्हा दाखल होण्याची भीती नसते. त्या तरुणींशी एकाच वेळी ७ ते ८ तरुण लग्न करण्याचा बनाव करतात. त्यानंतर त्या तरुणींशी कंत्राट असलेल्या कालावधीपर्यंत सामूहिक बलात्कारासह अन्य प्रकारे लैंगिक छळ करण्यात येते. अशाप्रकारे तरुणींना थेट देहव्यापार करण्यासाठी प्रवृत्त केल्या जाते.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sex traffickers arrested in nagpur were luring young women across the state from poor households with promises of quick cash adk 83 psg
First published on: 04-02-2024 at 12:10 IST