नागपूर : राज्यात चालू आठवड्याच्या सुरुवातीपासूनच तापमानात मोठी घट झाली आहे. आता किमान तापमानासह कमाल तापमान देखील कमीकमी होत आहे. उत्तर भारतातील वाढणाऱ्या थंडीचा परिणाम महाराष्ट्रावर देखील होत आहे. विदर्भ, उत्तर महाराष्ट्र व पश्चिम माराष्ट्रातील काही जिल्ह्यात तापमानात घसरण झाली आहे.

देशाच्या अनेक भागातील किमान तापमानात घट होत आहे. महाराष्ट्राच्या देखील अनेक भागात गेल्या काही दिवसात वातावरणात मोठा बदल झाला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार होण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे राज्याच्या हवामानात मोठ्या प्रमाणात बदल दिसून येण्याची शक्यता आहे. प्रामुख्याने मंगळवारपासून हे बदल दिसून येतील. हवामानाच्या या स्थितीमुळे दक्षिण भारतातील काही राज्यात पावसाची शक्यता असली तरीही महाराष्ट्रात मात्र, तसा काहीही अंदाज नाही. याउलट राज्यात पुढचे काही दिवस कोरडे हवामान राहील. पहाटेच्या सुमारास गारठ्यात वाढ होण्याची शक्यता आहे. रात्रीच्या तापमानात देखील घट होऊन थंडी वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये किमान तापमान १५ अंश सेल्सिअसपेक्षा कमी झाले आहे.

हेही वाचा…उमरेडच्या अपक्ष उमेदवाराकडे युती,आघाडीचे लक्ष

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तर कमाल तापमान देखील ३० अंश सेल्सिअसपेक्षा कमी आहे. पुण्यासह सांगली, सातारा आणि कोल्हापुरातील घाटमाथ्यावर थंडीत वाढ होण्याचा अंदाज आहे. येत्या चार-पाच दिवसात दिवसाचे आणि रात्रीच्या तापमानात आणखी घसरण होण्याची शक्यता आहे. विदर्भातील गोंदिया, गडचिरोली आणि ब्रम्हपूरी या तीन शहरांमध्ये किमान तापमान १२ ते १३ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. अनेक जिल्ह्यात तापमान कमी झाले आहे. पुण्यासह सातारा, नाशिक, कोल्हापूर, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, जळगाव जिल्ह्यात तापमानात मोठी घसरण झाली आहे. येत्या काही दिवसांत तापमानात आणखी घट होणार असल्याचा अंदाज आहे. पुण्यात किमान तापमान दहा अंश सेल्सिअसपर्यंत जाऊन पोहोचले आहे. तर मुंबईसह उपनगर, ठाणे, नवी मुंबईत देखील गारठा वाढला आहे. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग भागातही थंडीत वाढ झाली आहे. उत्तर भारतातून येणारे थंडी वारे महाराष्ट्रात हुडहुडी भरवत आहे. रात्री आणि पहाटेच्यावेळी सर्वाधिक गारठा जाणवत आहे. तर विदर्भात दुपारी आभाळी वातावरण असले तरी बोचरे वारे मात्र जाणवत आहेत. येत्या काही दिवसात राज्यात गारठ्यात वाढ होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.