लोकसत्ता टीम

वर्धा: बँक क्षेत्राला हादरवून सोडणाऱ्या येथील वर्धा नागरी बँकेतील सायबर हल्ला प्रकरणात दोघांना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. हैद्राबाद येथील शिवशंकर येंडू कोंडाल केसान व चंदू रमनय्या परचुरू, अशी आरोपींची नावे आहेत. अवघ्या पंधरा दिवसात अत्यंत किचकट अशा गुन्ह्यात आरोपींचा छडा लागला आहे.

२४ मे रोजी नागरी बँकेतील १ कोटी २१ लाख रुपयाची रक्कम लंपास करण्यात आली होती. नेफ्ट व अन्य सुविधांसाठी या नागरी बँकेने येस बँकेत खाते काढले आहे. त्या खात्यातून सायबर गुन्हेगारांनी ही रक्कम विविध बँकांच्या खात्यात ऑनलाईन वळती केली होती. पोलीसांनी तपासाची सूत्रे हातात घेताच प्रथम वळती करण्यात आलेल्या रकमेपैकी तीस लाख रुपये थांबविण्यात फत्ते केली. ज्या दिवशी बँकांच्या खात्यात रक्कम वळती करण्यात आली होती त्याच दिवशी वेगवेगळ्या शहरातील एटीएम केंद्रातून ही रक्कम काढल्या गेली. वर्धा सायबर गुन्हे विभागाने त्यानंतर तांत्रिक उकल करीत पुढे तपास सुरू केला.

हेही वाचा… वर्धा : नागरी बँकेवर सायबर दरोडा; हॅकिंग करीत सव्वा कोटी केले लंपास

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोलीस अधीक्षक नूरुल हसन यांनी बँक अधिकाऱ्यांशी स्वतः बोलून अनेक बाबींचा उलगडा केला. तीन स्वतंत्र तपास चमू गठित करण्यात आल्या. काही रहस्यमय बाबी उलगडल्या.त्या आधारे पोलिसांनी सात जूनला थेट मुंबई गाठली. अखेर दोघेही हाती लागले. त्यांची कसून पण अत्यंत गोपनीय चौकशी सुरू झाली आहे.