जळगाव – जिल्ह्यातील यावल तालुक्यात आमोदा येथे इंदूरहुन भुसावळकडे जाणारी खासगी आराम बस पुलाचा कठडा तोडून मोर नदीत कोसळली. रविवारी सकाळी हा अपघात झाला. या अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला. दोन जण गंभीर तर, १८ प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. जखमींमध्ये लहान मुलांचाही समावेश आहे.
मध्य प्रदेशातील गणेश ट्रॅव्हल्सची खासगी आराम बस सुमारे २८ प्रवाशांना घेऊन इंदूरहून भुसावळकडे जात होती. रविवारी सकाळी सातच्या सुमारास यावल तालुक्यातील आमोदा गावानजीकच्या जुन्या अरूंद पुलावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस थेट मोर नदीपात्रात कोसली. बस कोसळली त्या भागात पाणी नव्हते. बसमधून प्रवास करत असलेल्या फरिदा ईझी (५५, रा.भवानी पेठ, जळगाव) यांचा जागीच मृत्यू झाला. इतर प्रवाशांपैकी काही जण गंभीर तर काही किरकोळ जखमी झाले.
अपघाताची माहिती मिळताच फैजपूर पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक रामेश्वर मोताळे यांच्यासह कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. मदत कार्याला वेग देऊन पोलिसांनी महिलेचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवून, गंभीर आणि किरकोळ जखमींना तातडीने रुग्णालयांमध्ये रवाना केले. जखमींमध्ये फकरूद्दीन ईझी (४३), शिरीन ईझी (३०), ताहेर ईझी (१३), बुरहानुद्दीन ईझी (नऊ), फातेमा ईझी (३३), इन्सीया ईझी (सहा), जहेरा जकी (१२, सर्व रा. जळगाव) आदींचा समावेश आहे.
फैजपूर ते भुसावळ दरम्यान सकाळपासून रात्री उशिरापर्यंत वाहनांची मोठी वर्दळ असते. मोर नदीवरील पूल खूपच जुना असल्याने वाहनांसाठी तो धोकादायक ठरू लागला आहे. या पुलावर यापूर्वीही अनेक लहान- मोठे अपघात घडले आहेत. रविवारी देखील पावसामुळे आधीच रस्ता निसरडा झालेला असताना, चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने अपघात घडल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली.