नाशिक : जिल्ह्यात मंदिरांमध्ये चोरी करणारी टोळी गजाआड करण्यात ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेला यश आले. या प्रकरणात तीन संशयितांना अटक करण्यात आली असून ६६ किलो वजनाच्या पितळी वस्तु, २३८ ग्रॅम चांदी ताब्यात घेण्यात आली आहे. या प्रकरणातील एक संशयित अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असून समाजमाध्यमातून पुरातन मंदिरांची माहिती मिळवून चोरीची योजना आखत असे.
जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी जिल्ह्यातील नाउघड गुन्ह्यांचा आढावा घेवून अभिलेखावरील गुन्हेगारांच्या सध्याच्या ठावठिकाणांची माहिती घेण्यास सांगितले. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर यांचे पथक जिल्ह्यातील मंदिर चोरीच्या गुन्ह्यांचा समांतर तपास करीत होते. जिल्ह्यात गतवर्षी आणि चालु वर्षात सिन्नर, लासलगाव, निफाड, वाडीवऱ्हे या पोलीस ठाणे हद्दीत मंदिरातील चोरीचे गुन्हे घडले. या गुन्ह्यांमध्ये संशयित यांनी सीसीटीव्हीचे यंत्रदेखील चोरलेले आहे. तसेच गावातील पुरातन मंदिरांवर लक्ष केंद्रीत करत मंदिरातील चांदी, पितळी धातूंच्या किंमती वस्तू चोरी केल्या. चोरी करतांना कुठलाही पुरावा राहणार नाही, याची काळजी त्यांच्याकडून घेण्यात आली. निरीक्षक मगर यांच्या पथकाने घटनास्थळांवर मिळून आलेल्या तांत्रिक बाबींचे विश्लेषण करत माहिती मिळवली.
संशयित हे संगमनेर तालुक्यातील सराईत गुन्हेगार असल्याची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पुण्याच्या चाकण औद्योगिक वसाहत परिसरातून संशयित सुयोग दवंगे (२१, रा. हिवरगाव पावसा), संदीप उर्फ शेंडी गोडे (२३, रा. टिटवाळा), अनिकेत कदम (२१, रा. आरके नगर) यांना ताब्यात घेतले. तसेच संदीप साबळे (रा. सोमठाणे), दीपक पाटेकर (रा. टिटवाळा) हे फरार आहेत
संशयितांनी सिन्नर, निफाड, वाडीवऱ्हे, लासलगाव येथील गुन्ह्यांची कबुली दिली. संशयितांकडून २३८ ग्रॅम वजनाचा चांदीचा मुकूट, दोन चांदीच्या ताटल्या, २० किलो वजनाचा पितळी कळस , तीन समई, सहा पितळी घंटा, पितळी समई, पितळी घोडा तसेच मंदिरातील पितळी छोट्या वस्तू अशा ६६, २९० रुपये किंमतीच्या पितळी वस्तु आणि २३८ ग्रॅम चांदी असा एकूण एक लाख ९३ हजार २९० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
संशयितांकडून अन्य गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असून त्यांना वाडीवऱ्हे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. मंदिरांमधील चोरी प्रकरणातील प्रमुख संशयित सुयोग दवंगे हा सराईत गुन्हेगार असून तो म्होरक्या आहे. सध्या अभियांत्रिकी महाविद्यालयात यांत्रिकी विभागाच्या दुसऱ्या वर्षात शिकत आहे. संशयित हे गुगल मॅपवरून ग्रामीण भागातील पुरातन मंदिरे शोधून त्यांची पाहणी करत चोरी करत होते. यु ट्यूबवर कुलूप तोडण्याच्या चित्रफिती पाहून हायड्रोलिक कटरच्या मदतीने कुलूप कट करत होते.