नाशिक – कुंभमेळ्यानिमित्त जिल्ह्यातील नाशिकरोड, देवळाली, ओढा, खेरवाडी आणि कसबे सुकेणे या पाच रेल्वे स्थानकांचा कायापालट होणार आहे. यात देवळाली स्थानकात स्थिरीकरण, देखभाल दुरुस्ती व वाहनतळासाठी प्रत्येकी दोन मार्गिका तयार करण्यात येतील. नाशिकरोड रेल्वे स्थानकात सध्याच्या २२ बोगींऐवजी २४ बोगी असणाऱ्या रेल्वेगाडीच्या वाहनतळासाठी दोन मार्गिका विकसित केल्या जातील. फलाट क्रमांक एकचाही विस्तार होणार आहे. या विकासामुळे वेगवेगळ्या दिशांना रेल्वेगाडी थांबविणे (शेवटचे स्थानक) आणि नव्याने तिचा प्रवास सुरू करणे (उगमस्थान) म्हणून करण्यास मदत होणार आहे.
२०२७ मध्ये नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे कुंभमेळा होणार आहे. यावेळी मागील कुंभमेळ्यापेक्षा ५० पट अधिक म्हणजे तब्बल तीन कोटी भाविक सहभागी होण्याचा अंदाज आहे. हे लक्षात घेत रेल्वे मंत्रालयाने प्रयागराजच्या धर्तीवर मोठी तयारी सुरू केली आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि राज्यमंत्री रवनीतसिंह बिंदू यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी नियोजन आणि अंमलबजावणीची माहिती सादर केली.
रेल्वे स्थानकात भाविकांची ये-जा सुलभ व्हावी म्हणून प्रवाशांना थांबण्यासाठी मोठी जागा उपलब्ध राहील, असे नियोजन केले जात आहे. केंद्रीकृत नियंत्रण केंद्र स्थापन केले जाईल. ते प्रभावी देखरेखीसाठी सीसीटीव्ही कॅमेरे आणि वेळापत्रकासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता साधनांनी सुसज्ज असेल. पाचही स्थानकांमध्ये फलाटांवर छत, पाण्याच्या टाक्या, नवीन शौचालये, जलरोधक मोकळ्या जागा यांचीही व्यवस्था केली जाईल.
नाशिकरोड स्थानक
नाशिकरोड रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक चार हा द्विदिशात्मक असेल. फलाट क्रमांक एकचा २४ डब्यांच्या गाड्यांसाठी विस्तार केला जाईल. १२ मीटरचा एक आणि सहा मीटर रुंदीचे दोन पादचारी पूल, मोकळ्या जागेसाठी माल चढविणे-उतरविण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या शेड्सचा वापर होईल. नाशिकरोड येथे वाहनतळ, स्थिरीकरण मार्गिका विकसित केल्या जात आहेत. फलाटाचा पृष्ठभाग, हद्दीची भिंत व मेळा मनोऱ्याचे अद्ययावतीकरण होईल. अतिरिक्त फलाट बांधले जातील.
देवळाली रेल्वे स्थानक
कुंभमेळ्यात मुंबई आणि गुजरातकडून येणाऱ्या रेल्वेगाड्यांचे व्यवस्थापन देवळाली स्थानकातून होणार आहे. या स्थानकात स्थिरीकरण, देखभाल दुरुस्ती आणि वाहनतळासाठी प्रत्येकी दोन मार्गिका तयार करण्याचे नियोजन आहे. याशिवाय मुंबई आणि भुसावळ दिशेकडून येणाऱ्या गाड्यांसाठी टर्मिनल म्हणून काम करण्यासाठी तीन नवीन फलाट बांधले जाणार आहेत.
ओढा स्थानक
या स्थानकात रेल्वेगाडी तात्पुरती थांबविण्यासाठी मार्गिका केली जाणार आहे. एक ‘आयलंड फलाट’ विकसित करण्यात येणार आहे. सहा मीटर रुंदीचे चार पादचारी पूल बांधले जातील. लांब पल्ल्याच्या गाड्या तात्पुरत्या थांबू शकतील. यासाठी ‘लूप लाईन’ आणि यार्ड पुनर्रचनेचे कामही नियोजित आहे. पाच स्थिरीकरण मार्गिका बांधण्याचा प्रस्ताव आहे.
खेरवाडी
या रेल्वे स्थानकात एक नवीन फलाट बांधण्यात येणार आहे. सहा मीटर रुंदीचे दोन पादचारी पूल बांधले जातील. यार्ड पुनर्रचनेचे काम होईल.
कसबे सुकेणे
निफाड तालुक्यातील या स्थानकातील फलाटांचा विस्तार करण्यात येणार आहे. सहा मीटर रुंदीचे दोन पादचारी पूल आणि रेल्वेगाडी तात्पुरती थांबण्यासाठी मार्गिका, दोन्ही दिशेला गाडी सोडता येईल, अशी व्यवस्था करण्यात येणार आहे.