जळगाव : पक्ष रावेर लोकसभा मतदारसंघात अजूनही उमेदवार बदलू शकतो. पक्ष आपल्याला उमेदवारी जाहीर करु शकतो, अशी अपेक्षा राष्ट्रवादीचे भुसावळचे माजी आमदार संतोष चौधरी यांनी व्यक्त केली आहे. उमेदवारी न मिळाल्यास २४ एप्रिल रोजी आपण उमेदवारी अर्ज भरणार, अशी घोषणा चौधरी यांनी केल्याने शरद पवार गटाला बंडाचा धोका निर्माण झाला आहे.

रावेर मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून संतोष चौधरी यांना उमेदवारी नाकारुन श्रीराम पाटील यांना देण्यात आल्याने सुमारे दोनशेवर त्यांच्या समर्थकांसह पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त करुन राजीनामे दिले आहेत. भुसावळ येथील तेली समाज मंगल कार्यालयात सोमवारी सायंकाळी चौधरी यांनी निर्धार मेळावा घेतला. मेळाव्यात मार्गदर्शन करताना, चौधरी कुटुंबावर पक्षाकडून अनेक वेळा अन्याय झाला असला, तरीही आपल्या हृदयात शरद पवार यांचे स्थान कायम असल्याचे सांगितले.

हेही वाचा – धुळे : लसूण भरलेल्या मालमोटारीत हे काय… पोलीसही चकित

रावेरमधून २००९ मध्येच लोकसभा निवडणूक लढविण्याची इच्छा होती. मात्र, षडयंत्र रचून आपणास अडचणीत आणले गेले. जिल्हा बँकेचे अध्यक्षपद, राज्यात मंत्रिपद अशा संधी जाणूनबुजून डावलण्यात आल्या. चौधरी कुटुंबाचा पक्षाने फक्त वापर करून घेतला. आता लोकसभेचा आखाडा लढण्याची इच्छा नव्हती; पण शरद पवार यांनीच विचारणा केल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला होता. अखेर धनवान असलेले उद्योजक श्रीराम पाटील पक्षात नसताना त्यांचे नाव जाहीर झाले. पक्षाचे नेते शरद पवार हे मुक्ताईनगरला येत आहेत. तेथील जाहीर सभेत उमेदवारी बदलाची घोषणा करतील, अशी अपेक्षा आहे. चार पक्षांकडून मला बोलावणे आहे. शिवाय, त्या पक्षात प्रदेशाध्यक्षपद मिळणार आहे. त्यामुळे उमेदवारीच्या एबी अर्जावर माझीच स्वाक्षरी असेल. २४ एप्रिलला रावेर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरणार, असे चौधरी यांनी जाहीर केले.

व्यासपीठावर प्रहारचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनिल चौधरी, माजी नगरसेवक उल्हास पगारे, सलीम पिंजारी, संगीता ब्राह्मण आदींची उपस्थिती होती.

हेही वाचा – बस-दुचाकी अपघातात आजोबांसह नातीचा मृत्यू, संतप्त ग्रामस्थांचे आंदोलन

चौधरी कुटुंब कुटनीतीचा बळी – अनिल चौधरी

चौधरी कुटुंब कुटनीतीचा नेहमीच बळी ठरत आला आहे. हे सर्व राजकारण आमदार शिरीष चौधरींच्या माध्यमातून घडले असून, याची किंमत त्यांना आगामी निवडणुकीत मोजावी लागेल, असा दावा प्रहार जनशक्ती पक्षाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनिल चौधरी यांनी केला. ज्यांनी हे सर्व घडवून आणले, त्यांचा हिशेब रावेर विधानसभेच्या निवडणुकीत आपण चुकता करू. चौधरी नकोच म्हणून आताही रावेरमध्ये राजकारण झाले, असा आरोप त्यांनी केला.