नाशिक – आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, शिवसेनेेच्यावतीने (एकनाथ शिंदे) येथे आयोजित बैठकीत अहिल्यानगर जिल्ह्यातील दोन गटात सभागृहाबाहेर जोरदार धुमश्चक्री उडाली. राष्ट्रवादीचा (शरद पवार) पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा आरोप होऊन वाद झाल्याचे सांगितले जाते. अकस्मात हाणामारी झाल्याने गोंधळ होऊन पोलिसांची तारांबळ उडाली.

महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या पूर्वतयारीसाठी सोमवारी शिंदे गटाने अहिल्यानगर, नंदुरबार, धुळे, जळगाव आणि नाशिक जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या जिल्हानिहाय बैठकीचे आयोजन नाशिक येथील हॉटेल एक्स्प्रेस इन येथील सभागृहात केले होते. बैठकीस नेते, उपनेते, पालकमंत्री, आजी-माजी मंत्री, खासदार, आमदार, संपर्कप्रमुख, सहसंपर्कप्रमुख, जिल्हाप्रमुख, महानगरप्रमुख, तालुकाप्रमुख, शहरप्रमुख आणि पक्ष प्रवेश झालेल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना निमंत्रित करण्यात आले होते. उद्योगमंत्री उदय सामंत, शिक्षणमंत्री दादा भुसे, पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठकीला सुरुवात झाली. पहिली बैठक अहिल्यानगर जिल्ह्याची होती. ती झाल्यानंतर सभागृहाबाहेर अहिल्यानगरचे शहरप्रमुख सचिन जाधव आणि बाबू शेठ यांच्या गटात राडा झाला. परस्परांना शिवीगाळ झाली.

पोलिसांनी हस्तक्षेप करीत वाद सोडवला. काहींना बाहेर नेले. तरी वाहनतळात जाऊन पुन्हा दोन्ही गटात धक्काबुक्की झाली. काहींनी बैठकीत तक्रारी केल्यामुळे दुसऱ्या गटाने हल्ला चढविल्याची चर्चा सुरू आहे. अहिल्यानगरच्या पदाधिकाऱ्यांनी आमच्या पक्षीय बैठकीत कर्जतमधील राष्ट्रवादीचा (शरद पवार) पदाधिकारी दिसला, त्याला बाहेर काढल्याने गोंधळ झाल्याचे सांगितले. या बैठकीत तो कसा आला, असा प्रश्न एका गटाने केला.

अहिल्यानगरमध्ये पक्षांतर्गत असंतोष ?

बैेठकीतील दोन गटातील वादावर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी भाष्य केले. स्वताच्या प्रसिद्धीसाठी बैठकीतील माहिती बाहेर देणे योग्य नाही. संबंधितांना समज दिली गेली आहे. शिवसेना पक्ष मोठा झाला आहे. ही बैठक प्रमुख पदाधिकाऱ्यांची होती. बैठकीत दुसऱ्या पक्षाचा कोणी येऊन बसला असेल तर त्याला भिंग घेऊन शोधून काढू, असे त्यांनी नमूद केले. अहिल्यानगरमध्ये नवीन आमदार चांगले काम करीत आहेत. अकोल्यात मेळावा झाला. त्याची पक्षाने दखल घेतली. पक्षाच्या काही लोकांनी हा मेळावा होऊ नये म्हणून प्रयत्न केले. ही बाब आम्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर मांडणार असल्याचे सामंत यांनी सूचित केले.