नाशिक : विद्यापीठात आतापर्यंतच्या विशाखा काव्य पुरस्कार विजेत्या पुस्तकांचे स्वतंत्र दालन उभारण्यात येईल. तसेच पुरस्कारप्राप्त पुस्तके विद्यापीठ संकेतस्थळावर स्वतंत्रपणे ई दालन करून कायमस्वरूपी जगभरातील साहित्यप्रेमींना उपलब्ध करून देण्यात येतील, अशी घोषणा येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे यांनी केली.
मुक्त विद्यापीठाच्या कुसुमाग्रज अध्यासनाच्या वतीने देण्यात येणाऱ्या विशाखा काव्य पुरस्काराचे वितरण मंगळवारी विद्यापीठाच्या आवारात करण्यात आले. यावेळी कुलगुरु प्रा. सोनवणे यांनी ही घोषणा केली. अध्यासनाच्या वतीने २०१८ पासून २०२४ पर्यंतचे पुरस्कार एकूण २२ जणांना विद्यापीठ वर्धापन दिनाच्या पूर्वसंध्येस विद्यापीठ मुख्यालयात उत्तरोत्तर रंगत गेलेल्या काव्य मैफिलीदरम्यान देण्यात आले.
काव्यमैफल ही पुरस्कार विजेत्या कवींनी आपल्या स्वरचित कवितांनी सजवून आपली निवड किती सार्थ आहे हे सप्रमाण सिद्ध केले. कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे यांच्या हस्ते आणि अध्यक्षतेखाली पुरस्कार वितरण सोहळा झाला. प्रमुख पाहुणे म्हणून विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन, विद्यापीठ व्यवस्थापन मंडळ सदस्य डॉ. संजीवनी महाले, कुलसचिव दिलीप भरड, परीक्षा नियंत्रक भटूप्रसाद पाटील, कुसुमाग्रज अध्यासन प्रमुख डॉ. दिलीप धोंडगे हे उपस्थित होते.
पुरस्कार विजेत्यांमध्ये २०१८ मधील प्रथम – तन्वी अमित (निष्पर्ण फांदीवरचे पक्षी), द्वितीय – संतोष आळंजकर (मातीत हरवल्या कविता) आणि तृतीय – मोहन शिरसाठ (नाही फिरलो माघारी), २०१९ – प्रथम – विशाखा विशाखा (तुमुल अंतरीचे) आणि संदीप जगदाळे (असो आता चाड), द्वितीय – विनायक पवार (नामुष्कीचे पिढीजात वर्तमान) आणि अनिल साबळे (टाहोरा), तृतीय – गजानन फुसे (दिवस बोलू देत नाहीत), २०२० – प्रथम – अक्षय शिंपी (बिनचेह-याचे कभिन्न तुकडे), द्वितीय – देवा झिंजाड (सगळं उलथून टाकलं पाहिजे), तृतीय – नामदेव कोळी (काळोखाच्या कविता), २०२१ – प्रथम – तेजस मोदक (तृष्णाकर्ष), द्वितीय – रमजान मुल्ला (अस्वस्थ काळरात्रीचे दृष्टांत), तृतीय – मेघराज मेश्राम (माणूस असण्याच्या नोंदी) आणि विवेक काटीकर (दिक्काल धुकं पसरलेले सर्वत्र), २०२२ – प्रथम – सरिता पवार (राखायला हवी निजखुण), द्वितीय – प्रवीण अक्कानवरू (औटघटकेची युगांतरं), तृतीय – अमोल देशमुख (आठ फोडा आन बाहेर फेका), २०२३ – प्रथम – तान्हाजी बोऱ्हाडे (जळताना भुई पायतळी), २०२४ – प्रथम – सुनीता डागा (तुझं शहर हजारो मैलांवर), द्वितीय – सागर जाधव जोपूळकर (माती मागतेय पेनकिलर) आणि गौतम ढोके (दंगल होतेच कशी?) यांचा समावेश आहे.
विद्यापीठातर्फे ‘विशाखा काव्य पुरस्कार’ प्रथमतःच प्रकाशित काव्यसंग्रहाला दिला जातो. द्विस्तरीय निवड पद्धतीने त्यासाठी तीन सर्वोत्तम काव्यसंग्रहाची निवड केली जाते. प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या पुरस्कारासाठी अनुक्रमे २१ हजार, १५ हजार आणि १० हजार रुपयांचा धनादेश (दोन विजेते असल्यास धनराशी विभागून), प्रमाणपत्र, स्मृतीचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.