रुग्णशय्यांची संख्या सात हजार करणार

नवी मुंबई : प्राणवायू तसेच अतिदक्षता रुग्णशय्यांपेक्षा सध्या करोना रुग्णांना प्राथमिक उपचार असलेल्या करोना काळजी केंद्रांची जास्त आवश्यकता आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने शहरात सात हजारांपेक्षा जास्त रुग्णशय्या केवळ करोना काळजी केंद्रांत वाढविण्यात येणार आहेत. त्यासाठी शाळा, महाविद्यालये आणि वसतिगृह ताब्यात घेतली जाणार आहेत. सध्या पालिकेच्या करोना काळजी केंद्रातील रुग्णशय्या ४ हजार ४४० आहे. करोनाविषयी असलेली भयावह भीती कमी झाल्याने केवळ काळजी केंद्रातील उपचाराने रुग्ण बरे होत असल्याचे आढळून आले आहे.

नवी मुंबईत करोना रुग्णांची दैनंदिन संख्या वाढत आहे. शहरात १६ विशेष सुविधा असलेली मोठी रुग्णालये असून त्यात करोना रुग्णालयाची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र या रुग्णालयातील अर्ध्या पेक्षा जास्त खाटा ह्या नवी मुंबईच्या आजूबाजूच्या शहरातील रुग्णांनी व्यापून टाकलेल्या आहेत. त्यामुळे शहरातील आर्थिक क्षमता असतानाही रुग्णांना खासगी रुग्णालयातील रुग्णशय्या मिळत नसल्याचे चित्र आहे. गेल्या वर्षीच्या करोना प्रादुर्भाव लाटेत भीतीने जास्त रुग्ण दगावल्याचे चित्र होते. मात्र यंदा रुग्णसंख्या जास्त आढळून येत असली तरी करोना काळजी केंद्रातील दहा किंवा १४ दिवसाच्या उपचारानंतर रुग्ण बरे होऊन घरी जात असल्याचे चित्र आहे. त्यामुळे पालिकेने बंद केलेली करोना काळजी केंदे्र टप्याटप्याने सुरू करण्यास घेतली आहेत. आतापर्यंत १५ करोना काळजी केंदे्र सुरू करण्यात येत आहेत. याशिवाय शहरातील मोक्याच्या जागी असलेल्या शाळा, महाविद्यालये व वसतिगृह ताब्यात घेऊन पालिका त्या ठिकाणी काळजी केंद्र सुरू करणार आहेत. यासाठी ऐरोलीतील सेक्टर १४ मधील शाळा, घणसोली सेक्टर सातमधील शाळा आणि बेलापूरमधील एक शाळा निश्चित करण्यात आलेली आहे. या सर्व शाळा पालिकेच्या असून गेली अनेक माहिने त्या बंद आहेत. त्यामुळे या ठिकाणी कोविड काळजी केंद्रातील सुविधा उपलब्ध करून रुग्णांवर उपचार केले जाणार आहेत. सध्या या केंद्रातील रुग्णशय्या चार हजार ४४० आहे. मात्र त्यात आणखी साडेतीन हजाराची भर टाकून सात हजार रुग्णशय्या तयार केल्या जाणार आहेत. प्रशासनाने त्या दृष्टीने तयारी सुरू केली आहे. त्यासाठी नव्याने निविदादेखील मागविल्या जात असून डॉक्टर नर्सेस, वॉर्डबॉय यांची भरती सुरू करण्यात आलेली आहे.

जेवनाचा दर्जा निकृष्ट असल्याची तक्रार

शहरात रुग्णसंख्या वाढत असतानाचा दिवसा जमावबंदी व रात्री संचारबंदी कडक करण्यात आलेली आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांचा विरोधही वाढला असून दुकाने बंद हा यावर उपाय नाही असे मत भाजपाचे सरचिटणीस विजय घाटे यांनी व्यक्त केले आहे. पोलीस बळाचा वापर करून दहशत निर्माण करीत आहेत. त्याला आयुक्तांनी आवर घालावा. आरोग्य यंत्रणा अधिक सक्रीय करण्यासाठी आरोग्य मित्रा सारखी संकल्पना राबवून त्यात नागरिकांचा सहभाग देखील घ्यावा. अशी सूचना घाटे यांनी केली असून वाशी येथील करोना काळजी केंद्रात यापूर्वी उत्तम व सकस आहार दिला जात होता, मात्र महाविकास आघाडीतील एका मंत्र्याच्या दबावामुळे येथील जुना कंत्राटदार बदलून ऐनवेळी नवीन कंत्राटदाराला हे काम देण्यात आले असून या कंत्राटदारांच्या जेवणाचा दर्जा अधिक सुमार आणि निकृष्ट असल्याच्या तक्रारी रुग्णांना केल्या असल्याची बाब घाटे यांनी आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिली आहे.