खासगी संस्थेमार्फत नव्याने भरती प्रक्रिया

नवी मुंबई : नवी मुंबई पालिका प्रशासन करोनाचा लढा लढण्यासाठी पुरेशा सुविधा निर्माण करीत आहे. मात्र मनुष्यबळ तुटवडा ही समस्या प्रशासनाची डोकेदुखी ठरत आहे. पालिकेने आरोग्य विभागासाठी ५,४४० पदांची भरती जाहीर केली होती. प्रकिया राबविल्यानंतर प्रत्यक्षात १०२७ जणांना नियुक्ती पत्र देण्यात आले आहे. त्यामुळे दोन हजार दोनशे इतकेच मनुष्यबळ पालिकेकडे आहे.

पालिकेने गेल्या दोन वर्षांत अनेकदा ही भरती प्रक्रिया राबविली, मात्र प्रतिसाद मिळत नसल्याने आता खासगी संस्थेमार्फत ही पदे भरण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी निविदा प्रक्रिया राबवण्यात आली आहे.

नवी मुंबईत करोना प्रादुर्भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी पालिका प्रशासन प्रयत्न करीत आहे. मोठ्या प्रमाणात आरोग्यसुविधा निर्माण केल्या आहेत. पालिका क्षेत्रात १० करोना काळजी केंद्रांसह वाशी प्रदर्शनी केंद्रात १२०० खाटांचे करोना रुग्णालय, त्याचबरोबर रहेजा येथेही मोठ्या प्रमाणात खाटांची निर्मिती करण्यात येत आहे. एकीकडे खाटांची संख्या वाढवली जात असताना दुसरीकडे वैद्यकीय सेवा देणारे डॉक्टर व कर्मचारी यांची मोठी कमतरता भासत आहे. कमी मनुष्यबळात करोनासारख्या संकटाशी सामना केला जात आहे.

यामुळे पालिकेने करोनाकाळात आरोग्य विभागात मोठी भरती प्रक्रिया राबविली. यात डॉक्टर, रु ग्णसेविका, तंत्रज्ञ आदी ५, ४४० पदांसाठी ही प्रक्रिया राबविण्यात आली.

यापूर्वीही पालिकेने भरती प्रक्रिया राबविली होती. मात्र त्यालाही अल्प प्रतिसाद मिळाला होता. त्यात आता करोनाकाळात या मनुष्यबळाची सर्वांनाच गरज असल्याने प्रतिसाद मिळणार नाही. यासाठी पालिका प्रशासनाने यात काही बदल करीत किचकट प्रक्रिया टाळली होती. तुमचे वैद्यकीय क्षेत्राचे प्रमाणपत्र दाखवा व तात्काळ शासनमान्य वैद्यकीय अर्हता असेल तर लगेच हजर व्हा! असे नियोजन केले होते.

यानंतरही या पदांसाठी पालिकेकडे आलेल्या अर्जांपैकी मुलाखतीसाठी ६,७१३ जणांना पात्र ठरविण्यात आले. मात्र मुलाखतीला फक्त १४१८ जणच उपस्थित राहिले. यातील १,०२७ उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्यात आले मात्र प्रत्यक्षात ६०५ जणच हजर राहिले. त्यामुळे भरती प्रक्रिया राबवूनही ही पदे भरली न गेल्याने पालिका प्रशासनापुढे मनुष्यबळ ही समस्या कायम आहे. करोना नियंत्रणात असला तरी अद्याप दररोजचे तीनशे ते चारशे रुग्ण सापडत आहेत. कमी मनुष्यबळामुळे आरोग्य विभागावर प्रचंड ताण

येत आहे. त्यामुळे ही भरती प्रक्रिया खासगी संस्थेकडून राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याबाबतची निविदा प्रक्रियाही राबवली आहे.

प्रतिसाद कमी चांगली आरोग्यसेवा देण्याचा पालिकेचा प्रयत्न आहे. मात्र डॉक्टर व वैद्यकीय कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे. त्यासाठी राबवलेल्या भरती प्रक्रियेला चांगला प्रतिसाद मिळाला नाही.  त्यामुळे आता ही पदे खासगी संस्थेमार्फत भरण्याचा निर्णय घेतला असल्याचे पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी सांगितले.

भरतीला प्रतिसाद

आवश्यक जागा           : ५४४०

मुलाखतीसाठी पात्र      :   ६७१३

अनुपस्थित                  :  ५२९५

उपस्थित                      : १४१८

आदेश                         :  १०२७

प्रत्यक्षात हजर             :  ६०५