तरीही २२ वर्षांत पहिल्यांदाच तोटा कमी करण्यात यश
गेली अनेक वर्षे ४० कोटींपेक्षा जास्त वार्षिक तोटा सहन करणाऱ्या नवी मुंबई पालिकेच्या परिवहन उपक्रमाला आता ओला, उबर या खासगी प्रवासी सेवेचा फटका बसला आहे. त्यामुळे एनएमएमटीला १५ ते २० टक्के उत्पन्नावर पाणी सोडावे लागले आहे. तरीही मुंबई, ठाणे, पुण्यातील परिवहन उपक्रमांच्या तोटय़ापेक्षा एनएमएमटीचा तोटा कमी करण्यात उपक्रमाला यश आले आहे. बेस्ट, टीएमटी, पीएमटी यांचा तोटा ४० कोटींपेक्षा जास्त आहे.
२२ वर्षांपूर्वी २३ जानेवारीला नवी मुंबई पालिकेने २२ बस घेऊन स्वतंत्र परिवहन सेवा सुरू केली. त्यावेळी पालिकेत शिवसेनेची एकहाती सत्ता होती आणि त्याचे सुकाणू माजी मंत्री गणेश नाईक यांच्या हाती होते. त्यामुळे त्यांनी ही सार्वजनिक सेवा सुरू करण्यास प्राधान्य देत एनएमएमटीतील बसची संख्या टप्प्याटप्प्याने ४५० बसपर्यंत नेली. मंगळवारी या सेवेचा २२ वा वर्धापनदिन वाशी येथील भावे नाटय़गृहात साजरा करण्यात आला.
बंगळुरुतील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था वगळता कोणत्याही पालिकेची बससेवा यशस्वी झालेली नाही. तोटय़ात चालणारी सेवा अशीच या सेवेची गणना केली जाते. नवी मुंबई पालिकेची एनएमएमटीही त्याला अपवाद नसून या सेवेला गेली अनेक वर्षे ४० ते ४२ कोटी रुपये वार्षिक तोटा होत आहे. तो कमी करण्यात आता प्रशासनाला यश आले आहे. तो आता ३८ कोटीवर आला आहे.
तीन वर्षांपासून सुरू झालेल्या ओला, उबर या खासगी कार वाहतूक सेवा चांगल्याच प्रभावी ठरल्या आहेत. काही मिनिटांत उपलब्ध होणाऱ्या या सेवेचा फटका बेस्टप्रमाणेच एनएमएमटीला बसला आहे. नवी मुंबईतून मुंबईत कामानिमित्त जाणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्त आहे. त्यांच्यासाठी उपक्रमाने नरिमन पॉइंट, बोरिवली, अंधेरी, दादर मार्गावर वातानुकूलित बससेवा सुरू केली आहे. ओला, उबरची सेवा सुरू झाल्यापासून एनएमएमटीला १५ ते २० टक्के आर्थिक फटका (चार ते पाच लाख) बसला आहे.
परिवहन उपक्रमाला सहन करावा लागणाऱ्या तोटय़ाचा सामना करण्यासाठी उपक्रमाने वाशी, रबाळे येथील मोक्याच्या जागी असलेल्या बस डेपोचे वाणिज्य संकुलात रूपांतर करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी सल्लागार निविदा मागविण्यात आली आहे. ती बुधवारी उघडली जाणार आहे. या सल्लागार कंपनीने दिलेल्या सल्ल्यानुसार या वाणिज्य संकुलाची निर्मिती केली जाणार असून यातून येणाऱ्या वार्षिक तीन ते साडेतीन कोटी रुपयांच्या उत्पन्नातून हा तोटा भरून काढला जाणार आहे. या वाणिज्य संकुलाचे काम येत्या दोन वर्षांत पूर्ण करण्याचा प्रस्ताव आहे. यासाठीचे अनुदान नवी मुंबई पालिका आपल्या तिजोरीतून देणार आहे.
देशातील बंगळुरू येथील सार्वजनिक परिवहन उपक्रम फायद्यात मानला जात होता पण तोही आता तोटय़ात जाऊ लागला आहे. नवी मुंबई पालिकेच्या परिवहन उपक्रमाचा सातत्याने होणारा तोटा कमी करण्यात गेल्या दोन वर्षांत उपक्रमाला यश आले आहे. त्यात ओला, उबर या खासगी प्रवासी वाहतुकीचा फटका देखील उपक्रमाला बसला आहे. येत्या काळात तोटा कमी करण्याचा प्रयत्न आहे.
– शिरीष आरदवाड, व्यवस्थापक, एनएमएमटी, नवी मुंबई