पालिका आयुक्तांच्या पाहणीत उघड, सिडकोच्या भूखंडांवर कचरा

लोकसत्ता वार्ताहर

नवी मुंबई : नवी मुंबईतील घणसोली विभागातील स्वच्छतेची पाहणी मंगळवारी पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी केली असून त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. येथील मोकळया भूखंडावर कचरा तसेच पडून असून तलाव व नाले स्वच्छतेची गरज असल्याचे समोर आले आहे. आयुक्तांनी संबंधितांना तसे आदेश दिले आहेत.

नवी मुंबईत स्वच्छ अभियान शेवटच्या टप्प्यात असून केंद्रीय पथकाकडून शहराची कधीही पाहणी होऊ शकते. त्यामुळे पालिका आयुक्तांकडून केलेल्या कामांची पाहणी सुरू आहे. आयुक्तांनी मंगळवारी घणसोली विभागात पाहणी केली. सकाळी ७.३० पासून विकसित भागासह गावठाण, झोपडपट्टी तसेच एमआयडीसी क्षेत्रात त्यांनी पाहणी केली.

घणसोली स्टेशनसमोरील सिडकोचे मोकळे भूखंड विकसित नसल्याने ते पडीक अवस्थेत आहेत. त्या ठिकाणी स्वच्छता नाही. त्यामुळे आयुक्तांनी सिडकोमार्फत ते साफ करून घेण्याचे निर्देश यावेळी दिले. त्याठिकाणच्या विहिरींचीही सफाई नसल्याने ती करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. नाल्यांमध्ये कचरा टाकला जात असल्याचे दिसून आल्याने संरक्षक जाळ्या बंदिस्त करण्याच्या सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

गुणाली तलावाची स्वच्छता तेथील पोस्ट पेटी बंद असल्याने आयुक्तांनी नाराजी व्यक्तकेली. यावर तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. तलावांची रंगरंगोटी व सुशोभीकरण करण्यात आले आहे, मात्र आतील स्वच्छतेकडेही लक्ष द्यावे, असे यावेळी त्यांनी सांगितले.

राडारोडा अस्ताव्यस्त

रबाले एमआयडीसीतील पाहणीत रस्ते, पदपथ यांची कामे सुरू आहेत, मात्र आच्छादनाच्या हिरव्या जाळ्या दिसून येत नाहीत. राडारोडा अस्ताव्यस्त पडलेले आहे. ते तत्काळ उचलण्याचा सूचना पालिका आयुक्तांनी यावेळी दिल्या.