५० बस सेवेत; तोटा होत असल्याने बस सुरू करण्याची मागणी
पूनम सकपाळ, लोकसत्ता
नवी मुंबई : केंद्र शासनाच्या ‘फेम’ याजनेअंतर्गत नवी मुंबई परिवहन उपक्रमाच्या ताफ्यात आतापर्यंत १८० विद्युत बस दाखल झाल्या आहेत. मात्र यातील फक्त ५० बस प्रवाशांच्या सेवेत आहेत. १३० बस या एनएमएमटीच्या बसस्थानकात पडून आहेत.
पेट्रोल व डिझेल दरवाढीमुळे परिवहन उपक्रम तोटय़ात असताना या विद्युत बस का सुरू करण्यात येत नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकतीच महापालिकेत आढावा बैठक घेतली. यात डिझेलवरील बस सीएनजीत रूपांतरित करा व विद्युत बसचा वापर वाढवा अशा सूचना पालिका प्रशासनाला केल्या आहेत. त्यानंतर विद्युत बस सुरू करण्याबाबत परिवहन प्रशासनाचे नियोजन नाही. १३० पर्यावरण पूरक विद्युत बस करावे सेक्टर ४८ आणि सारसोळे बस आगारात धूळखात उभ्या आहेत.
करोनानंतर एनएमएमटीचा तोटा वाढला असून यात तीन कोटींची भर पडली आहे. परिवहनकडे एकूण ४०० बसगाडय़ा आहेत. त्यातील ३०० बसगाडय़ा सध्या प्रवाशी वाहतूक करीत आहेत. यात ५० विद्युत तर २२० या डिझेल आणि सीएनजीवरील आहेत. डिझेलवर चालणाऱ्या बसला प्रति २५० ते ३००किलोमीटर अंतरासाठी दिवसाला १० हजार ते १२ हजार रुपये खर्च येतो. या १३० बस सेवा देत असून त्यांचा दिवसाला १५ लाख ते १६ लाख तर महिन्याला ३ ते ४
कोटी इंधनावर खर्च होत आहे. त्यामुळे १२० विद्युत बसगाडय़ा सेवेत दाखल झाल्या तर हा खर्च कमी होणार आहे.
विद्युत बससाठी आवश्यक चार्जिंग केंद्रे उपलब्ध नाहीत. त्याचे काम सुरू असून लवकरच तुर्भे आणि घसणोली येथे हे चार्जिंग केंद्र सुरू करण्यात येणार आहेत. सर्व विद्युत बस लवकरच सुरू करण्यात येतील.
योगेश कडूस, व्यवस्थापक, नवी मुंबई परिवहन उपक्रम