नवी मुंबई : नवी मुंबई पालिका आयुक्तांनी शहरातील धोकादायक इमारती खाली करण्याचे व दरडी कोसळण्याच्या संभाव्य ठिकाणी असलेल्या झोपड्यांचे स्थलांतर करण्याचे तसेच पावसाळापूर्व शहरातील रस्त्यावरील कामे पूर्ण करण्याचे आदेश महिनाभरापूर्वी दिले होते. परंतु पाऊस सुरु होऊन चक्क महिना झाला तरी अद्याप पावसाळापूर्व कामे ही अपूर्णच असल्याचे काही भागांत पाहायला मिळत आहे.
नवी मुंबई महापालिका आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली पालिका मुख्यालयात झालेल्या बैठकीत पावसाळ्याच्या अनुषंगाने त्याआधी करावयाचा अत्यावश्यक कामांचा आढावा घेतला होता. पावसाळ्याआधी करण्यात येणारी नालेसफाई व मोठ्या गटारांची सफाई तत्परतेने सुरू करावी व नियोजित वेळेत पूर्ण करावी असे निर्देश दिले होते. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात आत्यंतिक गरजेशिवाय कोणत्याही नवीन खोदकामाची परवानगी दिली जाणार नसून लवकरात लवकर कामे पूर्ण करण्याचे आदेश दिले असताना महिनाभरानंतरही अद्याप कामे सुरूच आहेत.
शहरात पाण्याची पाईपलाईन टाकणे, गटारे बांधणे, नालेसफाई अशी अनेक कामे सुरूच आहेत. अद्यापही काही ठिकाणी रस्त्याच्या चौकांच्या कॉँक्रीटीकरणाची कामेही सुरू आहेत. त्यामुळे पालिकेच्या योग्य नियोजनाअभावी नागरिकांना वाहतूकीला अडचण येत आहे. पावसाळ्यात पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी नाल्याच्या ठिकाणी छोटे चेंबर बनवण्याचे काम विविध भागात पाहायला मिळते. रस्त्यावरच्या पाण्याचा तात्काळ निचरा व्हावा यासाठी छोटी गटारे व रस्ता यांच्यामध्ये पाणी जाण्यासाठी छोटे आकाराचे चेंबर केले आहेत.रस्त्याची उंची डांबरीकरण व कॉंक्रीटीकरण केल्यामुळे रस्त्यांची उंची वाढल्यामुळे रस्त्यावरचे पाणी छोट्या नाल्यात वाहून जाण्यासाठी ही कामे सुरु केली होती. पावसाळ्यापूर्वी सुरु झालेली कामे पाऊस सुरू होऊन महिना झाल्यानंतरही अद्याप सुरुच आहेत. याबाबत शहर अभियंता शिरीष आरदवाड यांना संपर्क केला असता संपर्क झाला नाही.
पावसाळा सुरू होण्याच्या आधी सर्व कामे पूर्ण करा. खोदकामे बंद करा असे आदेश आयुक्तांनी दिले असताना पाऊस सुरु होऊन महिना झाला तरी कामे सुरुच आहे. काही ठिकाणी चौक काँक्रीटीकरणाचे काम अद्याप पूर्ण झाले नाही. त्यामुळे आम्हाला अडचण येते. त्यामुळे रेल्वे स्थानक गाठताना उशीर होतो. महेश राऊत, स्थानिक नागरिक