आज अत्युच्च पदी, शिखरावर विराजमान असलेला कोणी उद्या असा काही कोसळतो की कोणाच्या खिजगणतीतही तो राहत नाही. इतिहासात अशी कितीतरी उदाहरणं सापडतील. आयोडिन हे त्यापैकीच एक. एक काळ असा होता की आयोडिनशिवाय छायाचित्रण होत नसे. चांदीच्या पत्र्यावर छायाचित्र घेतलं जाई ते त्या पत्र्यावर लेपन केलेल्या सिल्वर आयोडाईड या चांदी आणि आयोडिन यांच्या संयुगाच्या मदतीनं. तसं सुरुवातीला चांदी आणि हॅलोजन गटातील कोणत्याही मूलतत्त्वाचा वापर करता येतो असं दिसलं होतं. कारण या संयुगाच्या, सिल्वर हॅलाईडच्या, स्फटिकांमध्ये प्रकाशाला दाद देण्याचा गुणधर्म होता. त्या प्रकाशाबरोबरच्या विक्रियेतून चांदी आणि हॅलोजन वेगळे होऊन त्या चांदीच्या रूपात, ज्याच्यावरून तो प्रकाश परावर्तित झालेला असेल त्याची प्रतिमा उमटत असे. त्यानंतर तो पत्रा काही क्षारांनी धुतला की विक्रिया न झालेलं सिल्वर हॅलाईड व सुटा हॅलोजन निघून जाई. प्रतिमेच्या रूपातली चांदी तिथंच राहत असे. ही प्रतिमा अर्थात उलटी असे. म्हणजे जिथं मूळ दृश्यावरून प्रकाशकिरण परावर्तित झालेला होता तिथं त्या चांदीची छाया पडलेली असल्यानं पत्र्यावर काळा ठिपकाच उमटे. उलट जिथं प्रकाश नव्हता तिथं छाया नसल्यानं ती जागा उजळ राही. पण या उलटय़ा प्रतिमेला सुलटी करण्यासाठीच्या रासायनिक प्रक्रियेचाही शोध लागला आणि समोरच्या दृश्याचं स्पष्ट चित्र मिळू लागलं. ही रासायनिक विक्रिया ध्यानात आल्यानंतर सुरुवातीला सिल्वर क्लोराईडचा थर त्या पत्र्यावर दिला जात असे. पण त्यापेक्षा सिल्वर आयोडाईड अधिक प्रभावी ठरत असल्याचं समजलं. तेव्हापासून त्याच संयुगाचा वापर होऊ लागला. नंतर चांदीच्या पत्र्याऐवजी पातळ प्लास्टिकसारख्या पदार्थाची फिल्म वापरायला सुरुवात झाली. त्याचा एक उद्योगधंदाच उभा राहिला. साध्या घरगुती स्वरूपातल्या स्थिर छायाचित्रणापासून ते चित्रपटासाठी केल्या जाणाऱ्या चलचित्रापर्यंत ही सिल्वर आयोडाईडची फिल्मच वापरली जात होती.

आयोडिनची चलती होती. पण काळ उलटला. डिजिटल फोटोग्राफीचं तंत्रज्ञान विकसित झालं. फिल्मची अजिबात गरज नसलेले कॅमेरे वापरात आले. त्यातल्या सोईंनी पारंपरिक छायाचित्रणावर मात केली. फिल्मचीच गरज उरली नसल्यानं आयोडिनची सद्दीही संपली. एवढंच काय पण त्या संयुगाचा लेप दिलेल्या फिल्मचं उत्पादन करणाऱ्या कंपनीचंच दिवाळं निघालं. आज छायाचित्रण कलेचा आणि आयोडिनचा काडीचाही संबंध उरलेला नाही. कालाय तस्म नम दुसरं काय!

– डॉ. बाळ फोंडके

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ office@mavipamumbai.org