डॉ. वसंत शंकर हुजुरबाजार यांचा जन्म १५ सप्टेंबर १९१९ रोजी झाला. त्यांचे नातलग रँग्लर विष्णू वासुदेव नारळीकर यांच्या सल्ल्याने त्यांनी गणित विषयात उच्च शिक्षण घ्यायचे ठरवले. बनारस हिंदू विद्यापीठातून गणितामध्ये एम.ए. करताना कुलपती सुवर्णपदकसुद्धा मिळवले. तेथील वार्षिक विज्ञान परिषदेत डॉ. महालनोबीस, डॉ. सुखात्मे आणि सर सी. व्ही. रामन यांच्या भाषणांनी प्रेरित होऊन ते संख्याशास्त्राकडे ओढले गेले. त्यांच्या बुद्धीची चुणूक जाणवलेल्या रँग्लर नारळीकरांनी, केम्ब्रिजमधील सर हॅरल्ड जेफ्रीझ यांच्याकडे हुजुरबाजार यांची संशोधनासाठी शिफारस केली. सर जेफ्रीझ मूलत: भू-भौतिकशास्त्रज्ञ असले तरी, अठराव्या शतकातले बेझ प्रमेय त्यांना सतत खुणावत राहिले. ते म्हणत, ‘‘जसे पायथॉगोरिअन प्रमेय हे भूमितीला एका वेगळ्या उंचीवर घेऊन गेले, तसे बेझ प्रमेय हे संभाव्यतेला एका वेगळ्या उंचीवर नेणार.’’ जेफ्रीझनी हुजुरबाजारांना बेझ प्रमेयाच्या सखोल संशोधनासाठी स्वीकारले. प्रबंधाचा अर्धाअधिक भाग बेझियन आकडेवारीशी संबंधित असल्यामुळे या क्षेत्रातील पहिले पीएच.डी. असण्याचा मान हुजुरबाजार यांना मिळाला.
सन १९४९ मध्ये भारतात परतलेल्या एवढ्या उच्चशिक्षित व्यक्तीला एक सुखासीन आयुष्य नक्कीच जगता आले असते. पण ते अव्हेरून ते आणि त्यांचे समकालीन डॉ. सी. आर. राव आदींनी गणिताच्या आणि संख्याशास्त्राच्या प्रसारासाठी रक्ताचे पाणी केले. गौहाती आणि लखनौ विद्यापीठात अध्यापन व मुंबई शासनाच्या अर्थशास्त्र आणि सांख्यिकी कार्यालयात तज्ज्ञ म्हणून काम केल्यानंतर हुजुरबाजार यांना १९५३ मध्ये पुणे विद्यापीठात गणित आणि संख्याशास्त्र विभाग स्थापन करण्यासाठी निमंत्रित केले गेले. हा विभाग प्रचंड नावारूपाला आणताना त्यांनी पदवी अभ्यासक्रम तर सुरू केलेच; पण नित्यनियमाने उन्हाळी शिबिरेसुद्धा आयोजित केली, ज्यात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांतून असंख्य विद्यार्थी तसेच प्राध्यापकही आवर्जून हजेरी लावत असत. प्राध्यापकांमार्फत संख्याशास्त्राचे महत्त्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याच्या तळमळीने केलेला तो एक उपक्रम होता. १९७५-७६ मध्ये राष्ट्रीय व्याख्याता अशी नेमणूक मिळाल्यावर त्यांनी वर्षभरात काश्मीर ते कन्याकुमारी असा पूर्ण देश पिंजून काढून संख्याशास्त्राचे महत्त्व देशभर पोहोचवले. ‘डेटा सायन्स’ या आजच्या चलनी नाण्याची काही प्रमाणात पायाभरणी हुजुरबाजार आणि तत्कालीन संख्याशास्त्रज्ञांच्या अथक परिश्रमातून झाली आहे.
संभाव्यता सिद्धान्तातील अलौकिक कामगिरीसाठी अॅडम्स पारितोषिक (१९६०), पद्माभूषण पुरस्कार (१९७४), सर जेफ्रीज यांनी एका निष्पत्तीला दिलेले ‘हुजुरबाजारांचा अपरिवर्तनीय घटक (इनव्हेरिअंट)’ हे नाव (१९७६), इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूटतर्फे गौरवग्रंथ (१९७९) अशा अनेक सन्मानांचे मानकरी असलेल्या हुजुरबाजार यांचे योगदान खचितच स्फूर्तिदायी आहे. – ऋतुजा उद्यावर-बुटाला
मराठी विज्ञान परिषद
संकेतस्थळ : www.mavipa.org
ईमेल : office@mavipamumbai.org