06 March 2021

News Flash

अवलंबित्व आणि स्वातंत्र्य

जगात दोन प्रकारची तत्त्वज्ञानं अस्तित्वात आहेत

जगात दोन प्रकारची तत्त्वज्ञानं अस्तित्वात आहेत- एक म्हणतं स्वत:च्या इच्छेनुसार काहीही करण्याचं स्वातंत्र्य असतं- फ्री विल. अर्थात ही संपूर्ण कल्पनाच मुळात चुकीची, पूर्णपणे असत्य असल्याने त्याविरोधात युक्तिवाद होऊ  शकतो, युक्तिवाद केला जातो आणि मग त्यातून एक पूर्णपणे विरोधातली बाजू उभी राहते. ती म्हणते – मुक्त कोणीच नाही. आपण तर केवळ कळसूत्री बाहुल्या आहोत आणि आपली सूत्रं एका अज्ञाताच्या हातात आहेत. तो जे ठरवतो, ते घडतं. आपण तर केवळ गुलाम आहोत, बाकी काहीच नाही.

या दोन्ही बाजू चुकीच्या आहेत. तुम्ही गुलामही नाही आहात आणि मुक्तही नाही. हे समजून घ्यायला थोडं कठीण आहे. कारण तुम्ही तुम्ही नाहीच, तर संपूर्णत्वाचा (होलनेस) एक भाग आहात. तुम्ही स्वत:चा विचार संपूर्णत्वापासून वेगळे म्हणून करत असाल, तर तुम्हाला गुलाम असल्यासारखं वाटेल. तुम्ही स्वत:ला संपूर्णत्वाचा एक भाग म्हणून समजून घेतलंत तर तुम्ही स्वामी असता, पण तुम्ही या संपूर्णत्वासह स्वामी असता, संपूर्णत्वाचे स्वामी नव्हे. या संपूर्णत्वाच्या विरुद्ध बाजूला जाऊन उभे राहिलात की तुम्ही गुलाम होता. तुम्ही नदीच्या प्रवासासोबत वाहत राहिलात तर स्वामी होता. तुम्ही ती नदीच होऊन जाता! नदीच्या प्रवाहाविरोधात जायचा प्रयत्न केलात की मात्र तुम्ही गुलाम होता.

मुक्त इच्छा असं काही नाहीच आणि गुलामगिरी असंही काही नाही. अवलंबित्व आणि स्वातंत्र्य हे दोन्ही शब्द खोटे आहेत. ते पूर्णपणे वगळूनच टाकले पाहिजेत, वापरूच नयेत हे शब्द. खरं आहे हे ते परस्परावलंबित्व. मी तुझ्यात आहे आणि तू माझ्यात आहेस. आयुष्य असंच असतं. आपलं अस्तित्व एकमेकांत असतं, ‘लोक’ एकमेकांमध्ये असतात. जो श्वास आत्ता एका क्षणापूर्वी माझ्यात होता, तोच आता तुझ्यात गेला आहे. एका क्षणापूर्वी मी म्हणू शकत होतो, हा माझा श्वास- पण आता कुठे आहे तो? आज जे काही रक्त म्हणून वाहतंय तुझ्या शरीरात; अगदी काही दिवसांपूर्वी ते एखाद्या झाडामध्ये रस म्हणून वाहत होतं; त्याचं फळ झालं आणि आता ते तुझ्या शरीरात वाहतंय. तू कधी तरी देह ठेवशील या पृथ्वीवर- मातीत मिसळून जाशील आणि पुन्हा त्या मातीतून एक अंकुर फुटेल; तू त्याचं खत होशील आणि पुन्हा एक झाड जिवंत होईल आणि त्याला एक फळ येईल, तुझ्या मुलांची मुलं ते फळ खातील. तू असंच शरीरात घेतलं आहेस तुझ्या आज्या-पणज्यांना आजही घेतो आहेस.

आणि हे चालतच राहतं निरंतर! संपूर्ण भूतकाळ वर्तमानाकडून ग्रहण केला जातो आणि हा सगळा वर्तमान पुढे भविष्याच्या पोटात शिरणार आहे. आयुष्य एकमेकांत गुंतलेलं आहे, खोल गुंतलेलं आहे. ते एखाद्या जाळ्यासारखं आहे. तू फक्त दोन दोऱ्यांना छेदून जाणाऱ्या बिंदूसारखा आहेस, तू कोणीच नाहीस, केवळ दोन दोऱ्यांना बांधणाऱ्या गाठीसारखा आहेस. जेव्हा तुम्हाला हे समजतं- तेव्हा तुम्हाला हसू येतं, खरंच हसू येतं! आतापर्यंत केवढं ओझं वाहत होतो आपण असं वाटतं! म्हणून येशू ख्रिस्त म्हणतो, या, माझ्या पाठीमागे या, माझं ओझं खूप हलकं आहे. तुमचं ओझं खूप जड आहे. तुमचं ओझं तुम्ही स्वत:च आहात. जेव्हा तुम्ही ते नसता, तेव्हा काहीच वजन नसतं, गुरुत्वाकर्षणही काम करत नाही तेव्हा. तुम्ही अधांतरी मार्गक्रमण करू लागता. तुम्हाला पंख फुटतात. उडू शकता तुम्ही..

स्वातंत्र्य आणि परावलंबित्व यांच्याकडे दोन शाखा म्हणून बघूच नका. या दोन्ही संकल्पना परस्परांत गुंतलेल्या आहेत. तुम्ही स्वतंत्र होण्याचा प्रयत्न करता, तेव्हा तुम्हाला परावलंबित्वाची भावना येते. तुम्ही स्वतंत्र होण्याचा प्रयत्न करता, तेव्हा तुम्हाला अपयश येतं, तुम्हाला वैफल्य येतं आणि पुन्हा तुम्हाला परावलंबी वाटू लागतं आणि या दोन्ही गोष्टी चुकीच्या आहेत. केवळ स्वत:मध्ये बघा, तुम्ही कोणीच नाही; केवळ वैश्विक किरण मार्गक्रमण करत असतात, एक जाळे तयार करत असतात, थोडे दिवस तुम्ही येथे असता आणि मग नाहीसे होता; मग पुन्हा तुम्ही इथे असाल- आणि पुन्हा नाहीसे व्हाल. तुम्ही कुठून येता? तुम्ही पुन्हा कुठे जाता? संपूर्णत्वातच! विश्रांती घेण्यासाठी तुम्ही नाहीसे होता. मग पुन्हा येताच इथे.

वसंत ऋतू येतो आणि झाडांना पालवी फुटते, पक्ष्यांचा किलबिलाट सुरू होतो; आणि मग तो गेलेला असतो, आणि सगळं काही शांत झालेलं असतं. तो पुन्हा येईल. किती तरी वेळा तुम्ही इथे आलेले आहात, किती तरी वेळा पुन्हा येणार आहात; पण एकदा का तुम्ही कोणीच नाही, हे संपूर्ण असं काही तरी तुमच्यामार्फत प्रवास करत आहे हे तुम्हाला समजलं की मग असं पुन:पुन्हा शरीरात फेकलं जाण्याची गरजच राहत नाही, तुम्ही आता सावध झाला आहात, जागृत झाला आहात. आता कोणत्याही साक्षात्काराची गरज उरलेली नाही; तुम्ही संपूर्णत्वात विश्रांती घेऊ लागता-आम्ही त्यालाच मोक्ष, निर्वाण म्हणत आलो आहोत. यालाच आम्ही अंतिम स्वातंत्र्य म्हणतो.

पाश्चिमात्य जगाला हे सगळं समजणं खूप कठीण आहे. कारण, तिथे स्वातंत्र्याबद्दल बोललं जातं ते मुक्त इच्छेच्या, फ्री विलच्या संदर्भात आणि पूर्वेकडे आपण स्वातंत्र्याबद्दल बोलतो तेव्हा ती सगळ्या मुक्त इच्छांपासून मुक्ती असते. स्वातंत्र्य म्हणजे स्वत:पासून मुक्त होणं. पाश्चिमात्य जगात स्वातंत्र्य म्हणजे सर्व बंधनांपासून, मर्यादांपासून तुम्हाला मिळणारी मुक्ती, पण इथे तुम्ही उरताच, हे तुमचं स्वातंत्र्य असतं. पूर्वेकडे स्वातंत्र्याबद्दल बोललं जातं, तेव्हा त्यात तुम्ही उरतच नाही- तुम्ही बंधनाचा अविभाज्य भाग आहात आणि त्या बंधनासोबत तुम्हीही जाता. स्वातंत्र्य उरतं, तुम्ही नाही उरत; हा मोक्ष आहे. तुम्ही स्वतंत्र होता असं नाही, तर उलट तुम्ही तुमच्यापासून स्वतंत्र होता. तिथे स्वत:ला काही जागाच नाही. स्व पूर्णपणे नाहीसा होतो- ती एक खोटी संकल्पना होती, हुकूमशाही संकल्पना होती. उपयुक्त असेल, पण सत्य नव्हे!

(ताओ :  द थ्री ट्रेझर्स या लेखातील अंश/ओशो टाइम्स इंटरनॅशनल/सौजन्य ओशो इंटरनॅशनल फाउंडेशन /www.osho.com )

chaturang@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 24, 2018 3:34 am

Web Title: osho philosophy part 8
Next Stories
1 बी युअरसेल्फ
2 स्वातंत्र्य
3 आयुष्य अर्थपूर्ण की अर्थहीन?
Just Now!
X