विनायक जोशीलिखित ‘स्वरभावयात्रा’ या सदरातील ‘मधु मागशि माझ्या सख्या, परी..’ हा लेख वाचला. कविता किंवा गीत म्हणजे कवीच्या मनातील अनावर आवेगाचे वर्णन, भावनांचा कल्लोळ, त्यांचे प्रपाताप्रमाणे कोसळण्याचे वर्णन, विचारांचे द्वंद्व. अनेक गीते आणि कविता त्यांच्या सुमधुर चाली आणि संगीतामुळे हृदयाला

भिडतात, पण त्यांतला भावार्थ हरवतो असेही वाटते. कविता ही कवीच्या हृदयातून स्फुरते. त्याच्या मनातील दु:ख, द्वंद्व, सुख, आनंद त्यात उमटतात. पण ते सारे रसिकांपर्यंत पोहोचते का, याची शंका वाटते.

कवी भा. रा. तांबे यांची ‘जन पळभर म्हणतील हाय हाय..’ या कवितेचा भावार्थ आणि ‘मधु मागशि माझ्या सख्या, परी..’ ही कविता यांत काही समान धागे आहेत असे वाटते. आयुष्याच्या संध्याकाळी नायिका हरीभेटीसाठी तळमळत असताना तिचा सखा मधु पिळण्यासाठी बळ करू पाहतो हे कवीला निश्चितच अपेक्षित नाही. या गीताचा भावार्थ पुढीलप्रमाणे आहे.. आयुष्याच्या संध्याकाळी कवी म्हणतात, ‘आयुष्यभर कवितारूपी मधु पाजून रसिकांची तहान भागवत आलो आहे. आता हे कवितारूपी मधुघट रिते होत चालले आहेत. तेव्हा रसिकांनो, माझ्याकडून आता कवितेची अपेक्षा करू नका. वृक्ष, झऱ्यांचे गूढ, मधुर गूज आणि संसाराचे मर्म माझ्या कवितेतून उमटविण्यासाठी कृपया बळ करू नका. लागले नेत्र रे पैलतीरी..’

सदरलेखकाची क्षमा मागून स्पष्ट करू इच्छितो, की याच सदरात ‘चाफा बोलेना, चाफा चालेना’ याही गीताचा भावार्थ मागे प्रसिद्ध झाला होता. पण प्रत्यक्षात तो थोडा वेगळा आहे.

– हेमंत श्रीपाद पराडकर, मुंबई</strong>

‘बोलण्यासारखे उत्तर येते।’

‘बघ्याच्या भूमिकेतून’ या मंदार भारदे यांच्या सदरातील ‘तुला सांगतो भाऊ..’ हा लेख फारच बोलका होता. बोलणाऱ्याची माती खपते, न बोलणाऱ्याचे मोतीही खपत नाहीत असे म्हणतात. प्रत्यक्ष सरस्वती प्रसन्न झाली की मुक्यालाही भरती येते. आचार-विचार दोन्ही जुळले की उच्चारही तसाच येतो. मात्र असे बोलावे, की बोलण्याला काही अर्थ असेल. ‘माय ब्रदर्स अ‍ॅण्ड सिस्टर्स ऑफ अमेरिका’ या वाक्याने आपल्या भाषणाची सुरुवात करून स्वामी विवेकानंदांनी जगातील सर्वधर्मीयांची शिकागो परिषद एका वेगळ्याच स्तरावर नेऊन ठेवली. आपण गोड बोलले की समोरच्या शत्रूकडूनही गोडच शब्द ऐकू येतात. वादविवाद करणे सोपे, पण संभाषण करणे ही कला आहे. समर्थ रामदास म्हणतात, ‘पेरिले ते उगवते। बोलण्यासारखे उत्तर येते। तरी मग कर्कश बोलावे ते। काये निमित्ते॥’ थोडक्यात- वाणीवर ताबा ठेवला की बरेच अनर्थ टळतात. कटु बोलणे पशूंनाही दु:खी करते, तिथे माणसांचे काय? शरीरावर शस्त्राने झालेली जखम एक वेळ बरी होईल, पण कठोर शब्दांमुळे मनाला झालेली जखम कधीच भरून येत नाही, असे दासबोधात लिहिले आहे. पाय घसरला तर मागे घेता येतो, पण तोंडातून निघालेला शब्द मागे घेता येत नाही.

सहा दशकांपूर्वीच्या चाळ संस्कृतीत उघडी दारे असलेल्या खोल्यांतून येणारा आवाज एकच वाटायचा. सगळ्या आया एकत्र येऊन गप्पा मारायला लागल्या की कानी पडणारा प्रत्येक आवाज त्यावेळी आपल्याच आईचा वाटत असे. आजच्या बंद फ्लॅटमध्ये घुमणारा आवाज स्वत:पुरताच मर्यादित असतो. आज माणूस जसा यंत्रवत होत चालला आहे तसा आवाजही लोप पावत चालला आहे. व्हॉट्स अ‍ॅपवरील त्याचे ‘चॅटिंग’ हीच त्याची जीवनशैली झाली आहे. हे टाळायचे असेल तर काही वेळ हातातील मोबाइल बाजूला ठेवा; जेणेकरून तुमच्याबरोबर गप्पा मारण्यासाठी आतुरलेला तुमचा एकेकाळचा मित्र दिसेल आणि त्याच्याशी गप्पा मारताना सारी चिंता दूर होईल.

– सूर्यकांत भोसले, मुंबई

हेत्वारोप कशाच्या आधारे?

८ ऑक्टोबरच्या ‘लोकरंग’मधील ‘या मखलाशीचे कौतुक कुणाला?’ आणि ‘घडवून आणल्यासारखी चर्चा’ हे मधू देवळेकर यांच्या ‘गांधी आणि डॉ. हेडगेवार’ या लेखावरील

दोन पत्रलेख वाचले. त्याविषयी ही टिप्पणी-

१) ‘फाळणीचे गुन्हेगार’ हे डॉ. राम मनोहर लोहिया यांचे पुस्तक कोणाला गुन्हेगार म्हणत आहे ते वाचावे. २) १९४७ च्या फाळणीसंदर्भात रा. स्व. संघाचा काहीच संबंध आलेला नाही. वाटाघाटी ज्यांनी केल्या त्यात काँग्रेस, मुस्लीम लीग आणि इंग्रज सरकार हे पक्ष होते. त्यामुळे इतरांना त्याबद्दल श्रेय किंवा अपश्रेय देण्याचा प्रश्नच नाही.

३) ‘हिंदुस्थान हिंदूओं का’ ही घोषणा स्वा. सावरकरांची.. म्हणजे हिंदुमहासभेच्या अधिवेशनातील आहे. तिच्याशी रा. स्व. संघाचा संबंध नाही. ४) ज्या महात्मा गांधींचे मत ‘राजकारणात धर्माचे स्थान काही नाही’ असे होते, त्यांनीच खिलाफतसारख्या धर्मविषयक चळवळीला आग्रहाने स्थान दिले. त्यावेळी जिनांनीदेखील त्यास विरोध केला होता. ५) रा. स्व. संघाला भारताच्या स्वातंत्र्याबद्दल, संविधानाबद्दल आत्मीयता नाही, असा हेत्वारोप कशाच्या आधारावर केला जात आहे? ६) ना. ह. पालकर लिखित डॉ. हेडगेवार चरित्रात (पाचवी आवृत्ती, पृ. क्र. २६८-७८)

‘डॉ. हेडगेवार व महात्माजी’ या शीर्षकाचे प्रकरण आहे. हे चरित्र १९६० च्या सुमारास लिहिलेले आहे. मात्र, तेच अविश्वासार्ह आहे, असे म्हणावयाचे असल्यास अशा आक्षेपांना कोणत्याही संदर्भाची आवश्यकता नाही. कारण आक्षेप घेणारे जे म्हणतात तेच सर्वानी खरे मानावे; बाकीचे सर्वजण खोटे आणि अविश्वासार्ह आहेत असा हा न्याय आहे.

– नरेंद्र काळे, पुणे</strong>