पालघर: पश्चिम उपनगरीय रेल्वे मार्गावरील सफाळे स्थानकातील फाटक कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक १० व ११ सप्टेंबर या दोन दिवसांसाठी बंद करण्यात  आले. यामुळे नागरिकांना मोठय़ा प्रमाणात गैरसोयीला सामोरे जावे लागले. फाटकाच्या माध्यमातून पश्चिमेकडील बहुतांश गावे सफाळे बाजारपेठेला जोडली गेली आहेत. या गावांमधील सर्व नागरिकांना हा मार्ग सोयीचा ठरत असल्याने सर्व जण याच रस्त्याचा वापर करतात. पूर्व-पश्चिम भागाला जोडले जाणारे महत्त्वाचे फाटक असल्याने मोठय़ा प्रमाणात या फाटकाचा वापर केला जातो.

विरार- डहाणू रेल्वे चौपदरीकरणाचे काम सुरू असल्यामुळे तसेच फाटकातील पेवर ब्लॉक (फरशी) दुरुस्तीसाठी सफाळे स्थानकातील फाटक दोन दिवस बंद ठेवण्यात आले. मात्र पश्चिम रेल्वे प्रशासनाकडून फाटक बंद करत असल्याची कोणतीही पूर्वसूचना बहुतांश नागरिकांना न कळल्यामुळे नागरिकांचे हाल झाले. पूर्वसूचना न मिळाल्यामुळे पूर्व-पश्चिम असा प्रवास करण्यासाठी ठाकूरपाडा-कपासे- मांडे असा सहा ते सात किलोमीटरचा जास्तीचा प्रवास करायला लागला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोमवारी सफाळय़ाचा आठवडी बाजार असल्याने पश्चिमेकडील बहुतांश शेतकरी आपल्या वाडीतला भाजीपाला घेऊन बाजारामध्ये विक्रीसाठी आणतात. परंतु या अडचणीमुळे त्यांना आपला माल बाजारपेठेपर्यंत पोहोचवण्यात कसरत करावी लागली. बाजार असल्यामुळे नागरिकांची देखील पश्चिम-पूर्व अशी वर्दळ जास्त असते. फाटक बंद असल्यामुळे बहुतांश नागरिकांना आपले सामान डोक्यावर घेऊन पायपीट करावी लागली. नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागल्यामुळे रेल्वे प्रशासनाबद्दल नाराजी दिसून आली.