बोईसर : गणेश नाईक हे कसलेले पैलवान असून अंतिम तेच विजयी ठरतील. गणेश नाईक यांनी कधी संयम सोडला नाही असा दावा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी भाजपचे नेते व राज्याचे वनमंत्री गणेश नाईक आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात सुरू असलेल्या शीतयुद्धाविषयी बोलताना केला.
संजय राऊत हे शिवसेनेच्या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी पालघर येथे आले होते. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली. पालघर मध्ये येणारे अनेक प्रकल्प हे नरेंद्र मोदी, अमित शहा आणि अदानीच्या फायद्यासाठी आहेत असा आरोप राऊत यांनी केला.
दिवाळी निमित्त शिवाजी पार्कमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना दरवर्षी दीपोत्सवाचे आयोजन करत असते. यावर्षी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या दीपोत्सवाचे उद्घाटन होणार असून ही हे महाराष्ट्राचे राजकारणातील मोठी घडामोड व शिवसेना मनसे युती संदर्भातील प्रगतीची झेप असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले. महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे इथे बद्दल आज संध्याकाळी समजेल असे राऊत म्हणाले.
इज्जत गेली गावाची, मग आठवण आली भावाची असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढलेल्या वक्तव्या संदर्भात उत्तर देताना “सोडा हो शिंदे” असे म्हणत भावाची आठवण नाही येणार तर काय अमित शहांची आठवण येणार का ? असा प्रति सवाल केला.
पालघर जिल्ह्यात वाढवण, मुरबे येथे बंदर व केवळ येथे रिलायन्स प्रकल्प येत असल्याबद्दल विचारले असता भूमिपुत्रांच्या छाताडवर हे प्रकल्प लादले जात असल्याचे सांगत या प्रकल्पांमध्ये मोदी शहा यांची वैयक्तिक गुंतवणूक असल्याचे आरोप खासदार संजय राऊत यांनी केले. नुकसान भरपाई च्या नावाखाली नागरिकांची फसवणूक केली जात असून मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाची झालेली दूरदशा याबाबत देखील त्यांनी टीका केली.