पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुणे जिल्ह्यावर वर्चस्व असल्याने भाजपने अजित पवार यांना शह देण्यासाठी बारामतीनंतर आता इंदापूरकडे लक्ष केंद्रित केले आहे. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षात गेल्यानंतर भाजपने सोनई उद्योग समूहाचे ज्येष्ठ संचालक, पुणे जिल्हा परिषदेच्या कृषी संवर्धन विभागाचे माजी सभापती प्रवीण माने यांना भाजपमध्ये प्रवेश देऊन अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील या दोघांनाही शह देण्याची राजकीय खेळी खेळल्याचे स्पष्ट झाले आहे.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षासमोर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाबरोबरच भाजपचेही आव्हान उभे राहणार आहे. त्यामुळे अजित पवार गटाची कोंडी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. इंदापूर विधानसभा मतदारसंघ हा बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये असल्याने भाजपने आता इंदापूरकडे लक्ष देण्यास सुरुवात केली आहे.

माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना भाजपमध्ये प्रवेश देऊन राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या अध्यक्षपदी निवड केली होती. मात्र, विधानसभा निवडणुकीत राज्याचे क्रीडा व युवक मंत्री दत्तात्रय भरणे हे विद्यमान आमदार असल्याने महायुतीच्या जागा वाटपात ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाला द्यावी लागली. त्यामुळे हर्षवर्धन पाटील यांची अडचण झाली. त्यांनी ऐन निवडणुकीमध्ये भाजपला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षात प्रवेश केला.

प्रवीण माने हे देखील उमेदवारीसाठी इच्छुक होते. लोकसभा निवडणुकीमध्ये माने हे खासदार सुप्रिया सुळे यांचा प्रचार करत होते. मात्र ऐन प्रचारामध्ये त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना साथ देऊन खासदार सुनेत्रा पवार यांचा प्रचार केला. विधानसभा निवडणुकीमध्ये माने हे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाकडून उमेदवारी मिळण्यासाठी इच्छुक होते. मात्र, हर्षवर्धन पाटील यांना उमेदवारी मिळाल्याने यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला त्यांनी ३८ हजार मते घेतली. त्याचा फटका हर्षवर्धन पाटील यांना बसला आणि दत्तात्रय भरणे १९ हजार मतांनी विजयी झाले.

हर्षवर्धन पाटील यांनी भाजप सोडल्यानंतर इंदापूरमध्ये भाजप पुन्हा कमकुवत झाली होती. त्यामुळे भाजपने आता माने यांनाच प्रवेश देऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांना शह दिला आहे. त्याचबरोबर हर्षवर्धन पाटील यांचे चुलत बंधू, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती मयूरसिंह पाटील यांनाही पक्षात घेऊन भाजपने हर्षवर्धन पाटील यांच्यापुढेही आव्हान उभे केले आहे.

अजित पवार गटाची कोंडी

हर्षवर्धन पाटील यांच्या माध्यमातून भाजपने इंदापूर तालुक्यामध्ये बस्थान बांधण्यास सुरुवात केली होती. हर्षवर्धन पाटील हे पहिल्यांदा १९९५ मध्ये अपक्ष निवडून आले. त्यानंतर १९९९ आणि २००४ मधील विधानसभा निवडणुकांमध्ये अपक्ष निवडून आले. मात्र, २००९ च्या निवडणुकीत ते काँग्रेसकडून विजयी झाले. त्यानंतरच्या तीन विधानसभा निवडणुकांमध्ये दत्तात्रय भरणे यांनी त्यांचा पराभव केला.

हर्षवर्धन पाटील यांनी भाजपची साथ सोडून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षात प्रवेश केल्यामुळे अजित पवार यांच्यापुढे राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे आव्हान होते. मात्र, प्रवीण माने हे भाजपवासी झाल्याने आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाला राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाबरोबरच भाजपचेही आव्हान उभे राहणार आहे. त्यामुळे अजित पवार गटाची कोंडी होणार असल्याचे दिसून येते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मानेंमुळे भाजपचा फायदा काय?

प्रवीण माने यांचे वडील दशरथ माने यांनी सोनई उद्योग समूह उभारून शेतीपूरक उद्योगांच्या माध्यमातून इंदापूर तालुक्यात अनेक कुटुंबांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे माने कुटुंबीयांचा घरोघरी लोकसंपर्क आहे. प्रवीण माने हेदेखील उद्योग समूह आणि राजकीय क्षेत्रात सक्रिय असल्याने इंदापूर तालुक्यामध्ये भाजपला आणखी पाय रोवण्यास मदत होऊ शकणार आहे.