नागपूर : भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या पूर्व विदर्भातील लोकसभेच्या पाच जागांसाठी शुक्रवारी मतदान होत असून सर्व ठिकाणी महायुती विरुद्ध महाविकास आघाडी, अशी थेट लढत आहे. यात भाजपची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

पूर्व विदर्भात नागपूर, रामटेक, चंद्रपूर, गडचिरोली आणि भंडारा-गोंदिया या पाच मतदारसंघाचा समावेश होतो. पूर्व विदर्भ हा भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. २०१९ च्या निवडणुकीत पाच पैकी चार जागा भाजप-सेना युतीने तर एका जागा काँग्रेसने जिंकली होती. २०२४ मध्ये चित्र वेगळे आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्याचे वनमंत्री सुधीर मुनंगटीवार हे रिणांगणात आहेत. पाचही ठिकाणी थेट लढत असून जेव्हा -जेव्हा थेट लढत होते त्याचा फटका सत्ताधाऱ्यांना बसतो असा आजवरचा अनुभव आहे.

नागपूर मतदारसंघ

नागपूरमध्ये भाजपचे वरिष्ठ नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची लढत महाविकास आघाडीचे उमेदवार व काँग्रेस आमदार विकास ठाकरे यांच्याशी आहे. मतदारसंघात केलेला विकास हा गडकरींचा प्रचाराचा मुद्दा आहे तर विकास ठाकरे यांनी विकासाचा फायदा नागपूरला काय ? असा सवाल केला आहे. गडकरी यांनी पाच लाखाने विजयी होणार, असा दावा केला आहे. वंचितने महाविकास आघाडीला पाठिंबा दिला आहे. बसपाचे योगेश लांजेवर रिणांगणात आहे. असे असले तरी गडकरी विरुद्ध ठाकरे, अशीच लढत आहे. संघाचे मख्यालय असलेली नागपूरची जागा भाजपसाठी प्रतिष्ठेची आहे.

रामटेक मतदारसंघ

नागपूर जिल्ह्यातील दुसरा महत्वाचा मतदारसंघ म्हणजे रामटेक. येथे शिवसेनेचे राजू पारवे विरुद्ध महाविकास आघाडीचे शामकुमार बर्वे यांच्यात थेट लढत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची या मतदारसंघात सभा झाली. मुख्यमंत्र्यांनी रामटेकमध्ये तळ ठोकून होते. पारवे काँग्रेसचे आमदार होते. निवडणुकीपूर्वी त्यांनी सेनेत प्रवेश केला. त्यामुळे सेनेत नाराजी आहे. काँग्रेस नेत्या रश्मी बर्वे यांच्या जात प्रमाणपत्र रद्द होण्याचा मुद्दा प्रभावी ठरण्याची शक्यता आहे. बसपाचे संदीप मेश्राम रिंगणात आहे.

हेही वाचा… बॉलीवूड रॅपर, सापाच्या तस्करी प्रकरणात नाव आणि आता लोकसभेची उमेदवारी

चंद्रपूर-वणी-आर्णी मतदारसंघ

भाजपसाठी नागपूरनंतर सर्वात महत्वाचा मतदारसंघ चंद्रपूर आहे. राज्याचे वन व सांस्कृतिक खात्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवार हे महायुतीचे उमेदवार आहेत. महाविकास आघाडीने या मतदारसंघातील दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर यांना उमेदवारी दिली आहे. मुनगंटीवार विकासाच्या मुद्यावर ही निवडणूक लढत असून महाविकास आघाडीच्या प्रतिभा धानोरकर यांचा मतदारसंघातील जातीय समीकरणावर भर आहे. वंचितचे राजेश बेले रिंगणात आहे. मुनगंटीवार यांच्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभा घेतली. या मतदारसंघात प्रचार जात की विकास या मुद्याभोवती प्रचार फिरत आहे.

भंडारा-गोंदिया मतदारसंघ

भंडारा-गोंदिया मतदारसंघांत भाजपचे विद्यमान खासदार सुनील मेंढे हे महायुतीचे तर काँग्रेसचे डॉ. प्रशांत पडोळे हे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत. मेंढे विरुद्ध पडोळे लढतीत बहुजन समाज पार्टीचे संजय कुंभलकर व काँग्रेसचे बंडखोर सेवक वाघाये यांची उमेदवारी निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. महायुतीतर्फे येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची तर काँग्रेसच्या प्रचारासाठी राहुल गांधी यांची सभा झाली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व महायुतीतील घटक पक्ष राष्ट्रवादीचे (अजित पवार) नेते प्रफुल्ल पटेल यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे.

हेही वाचा… नवरा तुरुंगात, बायको निवडणुकीच्या रिंगणात; कोण आहेत श्रीकला रेड्डी?

गडचिरोली-चिमूर मतदार संघ

गडचिरोली-चिमूर मतदारसंघात महायुतीचे विद्यमान खासदार अशोक नेते विरुद्ध महाविकास आघाडीचे नामदेव किरसान यांच्यात थेट लढत आहे. नेते तिसऱ्यांदा निवडणूक लढत असून किरसान हा नवा चेहरा आहे. काँग्रसने दिलेल्या उमेदवारा विरुद्ध नाराजी व्यक्त करीत पक्षाचे नेते नामदेव उसेंडी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. मात्र जिल्ह्यातील काही ग्रामसभांनी काँग्रेसला पाठिंबा दिला आहे. या मतदारसंघावर राष्ट्रवादीच्या अजित पवार यांनी दावा केला होता. त्यामुळे भाजपला उमेदवार जाहीर करण्यास उशीर झाला. प्रचारा दरम्यान काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार व राष्ट्रवादीचे मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्यात आरोप-प्रत्यारोपाचा कलगीतुरा रंगला होता.