अमरावती : जिल्‍ह्याच्‍या राजकारणात अस्तित्‍वाच्‍या पाऊलखुणा जपण्‍यासाठी प्रयत्‍नशील असलेले युवा स्‍वाभिमान पक्षाचे बडनेरा येथील उमेदवार रवी राणा यांची महायुतीतील कार्यशैली वादात सापडली आहे. एकीकडे भाजपला पाठिंबा देताना अन्‍य दोन घटकपक्षांतील उमेदवारांसाठी उपद्रवमूल्‍य सिद्धतेची त्‍यांची भूमिका लपून राहिलेली नाही. दर्यापुरात शिवसेना (एकनाथ शिंदे) आणि अमरावतीत राष्‍ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्‍या उमेदवाराविरोधात थेट मैदानात उतरून त्‍यांनी महायुतीलाच आव्‍हान दिले आहे.

महायुतीत मिठाचा खडा टाकू नका, असा इशारा मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्‍यमंत्री अजित पवार यांनी दिल्‍यानंतरही राणा दाम्‍पत्‍याने अधिक आक्रमक भूमिका घेत आम्‍ही या इशाऱ्याला जुमानत नसल्‍याचा संदेश दिला आहे.

हेही वाचा :‘निष्ठावान’ अशी प्रतिमा उदयसिंह राजपूत यांना तारू शकेल ?

अमरावतीच्‍या राष्‍ट्रवादीच्‍या (अजित पवार) उमेदवार सुलभा खोडके यांच्‍या विरोधात त्‍यांनी उघड भूमिका घेत भाजपचे बंडखोर उमेदवार जगदीश गुप्‍ता यांच्‍या बाजूने कल दर्शविला आहे. अमरावतीत खरी लढत ही काँग्रेसचे डॉ. सुनील देशमुख आणि अपक्ष उमेदवार जगदीश गुप्‍ता यांच्‍यात असल्‍याचा त्‍यांचा दावा आहे. राणा यांनी भाजप कार्यालयाच्‍या एका बैठकीत बोलताना अमरावतीची एक जागा कमी झाली तरी चालेल, पण भाजपचे सर्व उमेदवार निवडून आले पाहिजेत, असे वक्‍तव्‍य केले होते. त्‍यांचा रोख हा सुलभा खोडके यांच्‍याकडे असल्‍याचे ध्‍वनित झाले होते. त्‍यांचा राग राष्‍ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्‍यक्ष संजय खोडके यांच्‍यावर आहे. खोडके यांनी लोकसभा निवडणुकीच्‍या वेळी भाजपच्‍या उमेदवार नवनीत राणा यांच्‍या विरोधात भूमिका घेतली. प्रहारच्‍या उमेदवाराला छुपी मदत केली. अजित पवार यांनी महायुतीसाठी प्रचाराची सभा घेतली, त्‍यावेळी खोडके गैरहजर राहिले. महायुतीच्‍या फलकावरील त्‍यांचे छायाचित्र हटविण्‍यास भाग पाडले. त्‍यामुळे खोडके यांना अजित पवारांनी त्‍यावेळी रोखायला हवे होते, असे राणा यांचे म्‍हणणे आहे. पण, त्‍याचा सूड म्‍हणून रवी राणा यांनी अमरावती मतदारसंघात महायुतीच्‍या उमेदवाराच्‍या विरोधात रान उठवल्‍याने त्‍याचा लाभ कुणाला होणार, याची चर्चा सुरू झाली आहे. त्‍यांचा भाजपमधील हस्‍तक्षेप वाढल्‍याचे सांगून भाजपचे कार्यकर्ते देखील नाराजी व्‍यक्‍त करू लागले आहेत.

हेही वाचा :मनोज जरांगे पाटील कुणाच्या बाजूने? उमेदवार मागे घेण्याचे कारण सांगताना म्हणाले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दुसरीकडे, दर्यापूर मतदारसंघात शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाचे उमेदवार अभिजीत अडसूळ यांच्‍या विरोधात त्‍यांच्‍या युवा स्‍वाभिमान पक्षातर्फे भाजपचे माजी आमदार रमेश बुंदिले यांना लढतीत आणून राणांनी महायुतीलाच सुरूंग लावला आहे. मंगळवारी मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राणा दाम्‍पत्‍याला इशारा देताना महायुतीची शिस्‍त पाळा, अशी सूचना केली. पण त्‍यावर अडसूळ पिता-पुत्राने लोकसभा निवडणुकीच्‍या वेळी घेतलेल्‍या विरोधी भूमिकेचा पाढा राणा यांनी वाचला. माजी खासदार नवनीत राणा या तर बुंदिले यांच्‍या प्रचारासाठी सभा घेऊ लागल्‍या आहेत. दर्यापूर तालुक्‍यातील दोन सभांमधून त्‍यांनी अडसुळांवर चांगलेच तोंडसुख घेतले. राणा दाम्‍पत्‍याच्‍या या पवित्र्याने महायुतीचेच नुकसान होण्‍याची शक्‍यता व्‍यक्‍त केली जात आहे.