काँग्रेसचे नाराज नेते आणि राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट हे ११ जून रोजी नवा राजकीय पक्ष स्थापन करणार असल्याचे सांगितले जात असले तरी असे काही घडणार नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. ४५ वर्षीय सचिन पायलट यांनी या विषयावर अधिकृत भाष्य केले नसले तरी त्यांचे समर्थक नव्या पक्ष स्थापनेच्या बातम्यांना बिनबुडाचे असल्याचे सांगत आहेत. मागच्या वर्षभरापासून सचिन पायलट आणि अशोक गेहलोत यांच्यात शीतयुद्ध सुरू आहे. ११ जून रोजी सचिन पायलट यांचे वडील आणि काँग्रेसचे दिवंगत नेते राजेश पायलट यांचा स्मृतीदिन आहे. २३ वर्षांपूर्वी रस्ते अपघातामध्ये राजेश पायलट यांचा मृत्यू झाला होता. सचिन पायलट यांनी यावर्षी ११ एप्रिल आणि ११ मे अशा दोन दिवशी अशोक गेहलोत यांच्याविरोधात आघाडी उघडली होती. काँग्रेसने मात्र सचिन पायलट यांची भूमिका पक्षविरोधी आणि पक्षाच्या विचारधारेविरोधात असल्याचे सांगितले आहे. ११ एप्रिल रोजी पायलट यांनी जयपूर येथील शहीद स्मारक येथे एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले होते. वसुंधरा राजे यांचे सरकार असताना राज्यात मोठा भ्रष्टाचार झाला असून त्याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी पायलट यांनी उपोषणाच्या माध्यमातून केली होती. त्यानंतर ११ मे रोजी पायलट यांनी पाच दिवसांची 'जन संघर्ष यात्रा' काढली. अजमेर ते जयपूर असा १२५ किमींचा टप्पा पायपीट करून त्यांनी पाच दिवसात पूर्ण केला. या यात्रेच्या शेवटी जयपूर येथे जाहीर सभा घेण्यात आली. भ्रष्टाचाराचा विरोध करत युवकांपर्यंत पोहोचण्यासाठी सचिन पायलट यांनी तीन मागण्या समोर ठेवल्या आहेत. एक म्हणजे, भ्रष्टाचाराने बरबटलेल्या राजस्थान लोकसेवा आयोगाला (RPSC) बरखास्त करावे आणि नव्या कायद्याद्वारे आयोगाची पुनर्रस्थापना करावी आणि पेपरफुटी प्रकरणामुळे ज्या लाखो विद्यार्थ्यांचे नुकसान झाले त्यांना भरपाई मिळवून द्यावी. तसेच वसुंधरा राजे यांच्या कार्यकाळात झालेल्या भ्रष्टाचार प्रकरणांची चौकशी करण्यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करावी, अशा त्या तीन मागण्या आहेत. तसेच या तीन मागण्या मे महिन्याच्या अखेरीपर्यंत पूर्ण न झाल्यास त्यांच्याकडून राज्यव्यापी आंदोलन हाती घेण्यात येईल, अशी घोषणा त्यांनी जयपूर येथील सभेत केली. हे वाचा >> Rajasthan : सचिन पायलट यांची भूमिका ‘एकला चलो रे’, अशोक गेहलोत म्हणाले, “तुझे-माझे करणारे कधी यशस्वी होत नाहीत” पायलट यांच्या आक्रमक भूमिकेमुळे काँग्रेसच्या वर्तुळात ११ एप्रिल, ११ मे आणि ११ जूनचा संबंध जोडण्यात आला. ११ जून रोजी सचिन पायलट यांचे वडील राजेश पायलट यांची पुण्यतिथीदेखील आहे. त्यामुळे यादिवशी ते मोठा निर्णय घेऊ शकतात, अशा चर्चांना पेव फुटले. जून २०२० मध्ये, सचिन पायलट यांनी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याविरोधात आघाडी उघडली होती. त्यावेळी अशीही चर्चा होती की, काँग्रेसचे काही आमदार राज्यसभेच्या निवडणुकीत विरोधात मत देऊ शकतात. पण तसे झाले नाही आणि काँग्रेसचा दुसरा उमेदवारही राज्यसभेवर निवडून गेला. या निवडणुकीच्या एक महिना आधी पायलट यांचे समर्थक आमदार ११ जून रोजी बंडखोरी करतील, असे सांगितले जात होते. सचिन पायलट त्यावेळी राजस्थानचे उपमुख्यमंत्री होते. तथापि, अशोक गेहलोत यांना या राजकारणाचा थांगपत्ता लागला आणि त्यांनी १० जून रोजीच आपली सूत्र फिरवली. सर्वात आधी सत्ताधारी पक्षाच्या सर्व आमदारांना मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी बैठकीसाठी बोलावण्यात आले. निवासस्थानी पोहोचल्यानंतर सर्व आमदारांना एक बसमध्ये बसवून शिव विला रिसॉर्टवर नेण्यात आले. मुख्यमंत्र्यांच्या या खेळीमुळे अनेक आमदारांना धक्का बसला. मुख्यमंत्र्यांच्या या डावपेचामुळे अनेक आमदार फुटण्यापासून वाचले. तसेच मुख्यमंत्री गेहलोत यांच्याच ताब्यात राज्याचे गृह खाते होते. त्यांनी करोना महामारीचे कारण पुढे करून राज्याच्या सीमा बंद केल्या. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी घेतलेल्या खबरदारीच्या उपायांमुळे राजस्थानमधील काँग्रेसचे सरकार वाचले. त्यानंतर गेहलोत यांनी पायलट यांच्यावर थेटपणे कधीही हल्ला केला नाही. राज्यसभेच्या निवडणुकीत काँग्रेसने आपल्या दोन्ही उमेदवारांना विजय मिळवून दिल्यानंतर सचिन पायलट यांनी सांगितले की, आमच्या पक्षाच्या आमदारांनी पक्षासाठी मतदान करून दोनही उमेदवारांना निवडून आणले आहे. आमच्यावर गत काळात जे आरोप लावले गेले, ते सर्व निराधार होते, हे या राज्यसभेच्या निकालावारून दिसून येते. हे वाचा >> Rajasthan : सोनिया गांधी नाही वसुंधरा राजे आहेत गेहलोत यांच्या खऱ्या नेत्या; सचिन पायलट यांची टीका जेव्हा जुलै २०२० मध्ये सचिन पायलट आपल्या विश्वासू आमदारांना घेऊन बाहेर पडले तेव्हा गेहलोत यांनी यावर बोलकी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, हा खेळ आता सुरू होत आहे, जो १० जून रोजी होणार होता. मानेसर येथे रात्री २ वाजता गाड्या पाठविण्यात आलेल्या होत्या. राजेश पायलट यांच्या पुण्यतिथीनिमित्त पुतळ्याळा पुष्पहार अर्पण करून त्याठिकाणाहून थेट विमानतळावर जाण्याचा काही जणांचा बेत होता. पण मी हे षडयंत्र उघड केले आणि सर्वांना माझ्या निवासस्थानी बैठकीसाठी बोलावले. मागच्या दोन महिन्यात राजस्थानमध्ये ज्या काही राजकीय घडामोडी घडत आहेत, त्यापाठी २०२० ची पार्श्वभूमी आहे. त्यामुळेच पायलट यांची पुढची भूमिका काय असणार याबाबत तर्क-वितर्क लढविले जात आहेत. ११ जून रोजी सचिन पायलट नवीन पक्ष स्थापन करणार नसले तरी ते त्यादिवशी आपली नवी भूमिका जाहीर करतील, असा अंदाज बांधण्यात येत आहे.