डॉ. नीलम गोऱ्हे यांचा भाजपला टोला

पुणे : महाराष्ट्राच्या राजकारणाचा सूक्ष्म अभ्यास असलेल्या वरुणराज भिडे यांनी राज्यातील शंभर कुटुंबांमध्येच राजकीय सत्ता आहे, अशी भूमिका विस्तृत लेखनाद्वारे मांडली होती. अशा घराणेशाहीतील काही लोकांना जवळ करूनच भारतीय जनता पक्षाने सत्ता संपादन केली आहे, अशा शब्दांत शिवसेना प्रवक्तया डॉ. नीलम गोऱ्हे यांनी भाजपला टोला लगावला. शिक्षणमंत्री किंवा सरकार बदलल्याखेरीज राज्यातील शिक्षणाची परिस्थिती सुधारणार नाही, अशी टिप्पणीही त्यांनी केली.

पत्रकार वरुणराज भिडे मित्रमंडळातर्फे गोऱ्हे यांच्या हस्ते ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या पुणे आवृत्तीचे वरिष्ठ सहसंपादक श्रीधर लोणी यांना ‘वरुणराज भिडे स्मृती पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. ‘लोकसत्ता’चे औरंगाबाद येथील खास प्रतिनिधी सुहास सरदेशमुख, ‘दिव्य मराठी’च्या वरिष्ठ बातमीदार जयश्री बोकील आणि ‘न्यूज १८ लोकमत’चे महेश तिवारी यांना आश्वासक पत्रकारिता पुरस्कार प्रदान करण्यात आला. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान पुणे केंद्रातर्फे ‘चालू घडामोडी’ या विषयात प्रावीण्य संपादन करणाऱ्या भाग्यश्री चौथाई आणि चंद्रकांत काईत या पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांना साहित्य संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले. मंडळाचे संस्थापक प्रा. विलास जोशी, अध्यक्ष उल्हास पवार उपस्थित होते.

गोऱ्हे म्हणाल्या, वरुणराज यांच्याकडे पत्रकारितेचा तिसरा डोळा होता. वर्तमानपत्रे उत्पादन होत आहेत का, ही चिंता त्यांना होती. व्यासंगी पत्रकाराने आपल्याविषयी लिहावे असे प्रत्येक राजकीय कार्यकर्त्यांला वाटत असते. मी आमदार होण्याआधीच ते आपल्यातून गेल्याने माझ्याबाबतीत ते घडले नाही. हल्ली लोकांचे प्रश्न विधान भवनामध्ये मांडून त्याची बातमी होत नाही, तर बातमीवर आधारित प्रश्न विचारले जातात; हे विधिमंडळातील राजकीय नेत्यांचे अपयश आहे.

महाराष्ट्राचे दारूण चित्र अभिमान वाटावे असे नाही. पण, सरकारची प्रत्येक गोष्ट वाईट आहे, असे म्हणणे आणि राजकीय चष्म्यातून बातमीदारी करणे योग्य नाही. विकासाकडेही पाहिले पाहिजे. केवळ सरकारच नाही, तर पत्रकार आणि सामान्य माणूसही चुकत असतो, असे मत देशमुख यांनी व्यक्त केले. पत्रकारांना सत्य सांगण्यापासून कोणी रोखू शकत नाही. राजकीय सत्तेपेक्षा वैचारिक सत्ता महत्त्वाची आहे.  आपल्यासाठी कलावंत व लेखक मोठे नाहीत, म्हणूनच आपला देश तेवढा महान नाही, अशी टिप्पणीही त्यांनी केली.