ग्रामपंचायत निवडणूकांसाठी जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याबाबत संभ्रम

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आरक्षित प्रवर्गातून निवडणूक लढविण्यासाठी आता उमेदवारी अर्ज दाखल करतानाच जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे. मार्च ते मे २०१८ कालावधीमध्ये मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या निवडणुकांमध्ये या निर्णयाची पुणे जिल्ह्य़ासह राज्यभर अंमलबजावणी करण्यात येणार आहे. मात्र, या निर्णयाची अंमलबजावणी फेब्रुवारीमध्ये घेण्यात येणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये करायची किंवा कसे, याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाकडून निवडणूक आयोगाकडे मार्गदर्शन मागविण्यात आले आहे.

दरम्यान, आरक्षित जागांवर निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना उमेदवारी अर्ज दाखल करताना जात वैधता प्रमाणपत्राऐवजी हमीपत्र देण्याची सवलत होती. जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र कालांतराने सादर करता येत होते. या सवलतीला शासनाच्या ग्रामविकास विभागाकडून ३१ डिसेंबर २०१७ नंतर स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्य़ासह राज्यात फेब्रुवारी महिन्यात होत असलेल्या ३१७ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना उमेदवारी अर्जासोबत सक्षम प्राधिकरणाने दिलेले जात प्रमाणपत्र व पडताळणी समितीने दिलेले वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

निवडणूक आयोगाच्या कार्यक्रमानुसार फेब्रुवारी महिन्यात पार पडणाऱ्या निवडणुकांसाठी नव्या नियमाची अंमलबजावणी करायची किंवा कसे, याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाकडून निवडणूक आयोगाकडे मार्गदर्शन मागविण्यात आले आहे. आयोगाकडून येणाऱ्या आदेशानुसारच जिल्ह्य़ातील ग्रामपंचायत निवडणूक पार पडतील, अशी माहिती जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी दिली.

२५ फेब्रुवारीला मतदान

जिल्ह्य़ातील मार्च ते मे २०१८ या कालावधीमध्ये कार्यकाळ संपुष्टात येणाऱ्या सदोतीस ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींसह विविध कारणांनी पदे रिक्त असलेल्या २७४ ग्रामपंचायतींच्या ५७६ सदस्यांच्या निवडणुकीसाठी २५ फेब्रुवारीला मतदान होणार आहे. जिल्ह्य़ातील ग्रामपंचायती व पोट निवडणुकांसाठी २२ जानेवारी रोजी आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. निवडणुकीसाठी २५ जानेवारी रोजी नोटीस प्रसिद्ध करण्यात आली असून ५ फेब्रुवारीपासून १० फेब्रुवारीपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. १२ फेब्रुवारी रोजी या अर्जाची छाननी करून १५ तारखेपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. त्याच दिवशी दुपारी तीननंतर उमेदवारांची अंतिम यादी व चिन्हांचे वाटप करण्यात येणार आहे. तर २६ फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे.