|| भक्ती बिसुरे

पुणे : महापालिके च्या मयूर कॉलनी-डहाणूकर कॉलनी या प्रभाग क्रमांक १२ मध्ये रस्ते विकसनाची मुख्य समस्या आहे. मयूर कॉलनी ते पौड फाटा हा विकास आराखड्यातील रस्ता अद्यापही मार्गी लागलेला नाही. गेल्या चार वर्षात या रस्त्याला गती देण्याचे कोणतेही ठोस प्रयत्न स्थानिक नगरसेवकांकडून झालेले नाहीत. मात्र निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रखडलेल्या रस्त्यांना गती देण्याचा प्रयत्न नगरसेवकांकडून सुरू झाला आहे. त्यासाठी बैठकांचा जोर सुरू झाल्याचे दिसून येत आहे.

कोथरूडमधील मयूर कॉलनी-डहाणूकर कॉलनी हा प्रभाग पुणे शहरातील विकसित प्रभाग म्हणून ओळखला जातो. महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यासह हर्षाली माथवड, वासंती जाधव हे भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक आहेत. तर, शिवसेनेचे पृथ्वीराज सुतार प्रभागाचे प्रतिनिधित्व करतात. बंगले, झोपडपट्टी, बैठी घरे आणि गृहनिर्माण संस्था अशा सर्व स्तरांमध्ये राहणारे नागरिक आहेत. त्यामुळे सर्व आर्थिक स्तरांतील नागरिकांच्या समस्या डोळ्यासमोर ठेवून नगरसेवकांनी काम करणे अपेक्षित आहे, मात्र तसे होताना दिसत नाही. वाहतूक कोंडी, अतिक्रमणे अशा समस्या प्रभागात असल्या तरी पर्यायी रस्ते, विकास आराखड्यातील रखडलेले रस्ते हीच या प्रभागातील प्रमुख समस्या आहे.

पौड रस्ता आणि कर्वे रस्त्यावरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी मयूर कॉलनी ते पौड फाडा यांना जोडणाऱ्या विकास आराखड्यातील रस्त्याचे काम मार्गी लागलेले नाही. या रस्त्यामध्ये असलेल्या भीमनगर परिसरातील घरांमुळे रस्त्याचे काम रखडले होते. रस्त्यावरील घरे पाडून काम करावे लागणार आहे. हा रस्ता मार्गी लागावा, यासाठी आत्ता नगरसेवकांकडून बैठकांचा धडाका सुरू झाल्याचे चित्र आहे.

वाहतूक कोंडी आणि अतिक्रमण या प्रमुख समस्यांकडे परिसरातील नागरिक लक्ष वेधतात. कर्वे रस्ता, पौड रस्ता या दोन प्रमुख रस्त्यांवरून वाहन चालवत कामाच्या ठिकाणी पोहोचताना प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो.  अतिक्रमणांच्या विळख्यामुळे रस्त्यावर ज्येष्ठ नागरिकांना चालण्यास जागा नाही. मोकळ्या जागांचा गैरवापर होत असल्याच्या तक्रारी आहेत. अस्वच्छ आणि पायाभूत सुविधांचा अभाव असलेल्या स्वच्छतागृहांचा प्रश्नही नागरिकांना भेडसावितो.

नागरिक म्हणतात

डहाणूकर कॉलनी गल्ली क्रमांक नऊच्या मागे मोकळी जागा आहे. झोपडपट्टीतील नागरिकांकडून तेथे अस्वच्छता के ली जाते. विशेष म्हणजे या झोपडपट्यांमध्ये स्वच्छतागृहे आहेत, तरी त्यांचा वापर होत नाही. यामुळे परिसरातील नागरिकांना त्रास होतो.  रात्री मद्यपींचा गोंधळ सुरू असतो.  नगरसेवक या प्रकाराकडे दुर्लक्ष करतात. – पूजा काळे, डहाणूकर कॉलनी

वाहतूक कोंडी ही परिसरातील प्रमुख समस्या आहे. दररोज सकाळी आणि संध्याकाळी पौड रस्ता, कर्वे रस्ता या भागातून इतरत्र कामासाठी जाणे आणि घरी परतणे म्हणजे वाहतूक कोंडीत अडकणे असा अनुभव आहे. नगरसेवकांनी याकडे लक्ष देणे अपेक्षित आहे. परिसरातील अतिक्रमणांकडे दुर्लक्ष के ले जात आहे. – नेहा देशपांडे, मयूर कॉलनी.

राजकीय प्रतिनिधी म्हणतात

कोथरूड या प्रभागाची ओळख आणि स्वतंत्र अस्तित्व जपणे नगरसेवकांना शक्य झालेले नाही. ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या कायम आहेत. महापौर प्रभागाचे प्रतिनिधित्व करत असतानाही विकास झालेला नाही. अडचणी आणि समस्या जशा होत्या तशाच आहेत. जाहिरातबाजी आणि नागरिकांची सदैव फसवणूक होत असल्याचे दिसत आहे. – श्याम देशपांडे, शिवसेना. 

नगरसेवक प्रभागात फिरकत नाहीत. नागरिक के ंद्रस्थानी ठेवून कल्पक योजना राबविल्या जात नाहीत. सुतार दवाखाना आहे तसाच आहे. भाजी मंडईचा वापर होत नाही म्हणून भाजी मॉल करण्याचे प्रयत्न होत आहेत. निधी वाया घालवण्याचे उद्योग आहेत. संपूर्ण प्रभागावर अतिक्रमणांचा विळखा आहे. जाहिरातबाजी सुरू आहे. – माधवी किशोर शिंदे, मनसे.

लोकप्रतिनिधी म्हणतात

नागरिकांच्या समस्यांचा प्राधान्यक्रम लक्षात घेत कामे सुरू आहेत. डहाणूकर कॉलनीतील स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उद्यानाचे काम पूर्ण के ले. सुतार दवाखान्यात अद्ययावत वैद्यकीय तपासण्यांची सुविधा दिली आहे.  शाळा अद्ययावत के ल्या. विद्युत तारा भूमिगत के ल्या असून विरंगुळा के ंद्रे, अभ्यासिका, शाळांमध्ये आग प्रतिबंधक फायर बॉल सारख्या सुविधा पुरवण्यात आल्या आहेत. – वासंती जाधव, नगरसेविका

डहाणूकर कॉलनी परिसरातील भुयारी मार्गाचे सुशोभीकरण के ले. कोथरूड गावठाण भागात जलवाहिन्या बसविण्याचे काम झाले आहे. पेव्हर ब्लॉक्स बसविण्यात आले आहेत. सुतार दवाखाना परिसरातील माथवड भाजी मंडईचे नूतनीकरण सुरू करण्यात आले आहे. लक्ष्मी नगर येथे महिलांसाठी स्वच्छतागृह उभे के ले आहे. मयूर कॉलनी येथे खेळाच्या मैदानासाठी तरतूद करण्यात आली आहे. – हर्षाली माथवड, नगरसेविका

शीला विहार ते मयूर कॉलनी रस्ता परिसरातील झोपडपट्टीमुळे वीस ते पंचवीस वर्ष रखडला होता. त्या झोपडपट्टीधारकांचे पुनर्वसन करून हा रस्ता पूर्ण करण्यात आला आहे. नळ स्टॉप दुहेरी उड्डाणपुलाचे काम नियोजित आहे.

करिष्मा चौक ते कर्वे पुतळा जोडणाऱ्या पुलाचे काम नियोजित आहे. भेलके नगर ते आशिष गार्डन रस्ता कमिन्स कंपनीकडील जागा ताब्यात घेऊन  खुला करण्यात आला आहे. – मुरलीधर मोहोळ, नगरसेवक

नाट्यप्रेमींसाठी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचे ४०० आसनक्षमतेचे नाट्यगृह सुरू करण्यात येत आहे. रस्ता रुंदीकरणाला प्राधान्य देण्यात आले आहे. पथदिवे बसवण्यात आले आहेत. सुतार दवाखाना परिसरातील अतिक्रमणे काढल्यामुळे रस्ता वाहतुकीसाठी खुला झाला आहे. सुतार दवाखाना ते पौड रस्ता जड वाहनांसाठी बंद के ल्यामुळे अपघात कमी झाले आहेत. – पृथ्वीराज सुतार, नगरसेवक

प्रभागातील महत्त्वाची ठिकाणे

मयूर कॉलनी, बालशिक्षण मंदिर शाळा, जोग शाळा, कर्वे रस्ता, पौड रस्ता, डहाणूकर कॉलनी, आयडियल कॉलनी, मृत्युंजयेश्वर मंदिर, कमिन्स कं पनी, डीपी रस्ता, महेश विद्यालय, यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, गुजराथ कॉलनी, कर्वे पुतळा, कोथरूड बस स्टँड.

तक्रारींचा पाढा

  • मैदानांचा अभाव
  •  स्वच्छतागृहांची दुरवस्था
  •  पर्यायी रस्त्यांचा अभाव
  • वाहतूक कोंडी नित्याची
  • पदपथांवर अतिक्रमणे

नगरसेवकांचे दावे

  •   रस्ते विकसनाला प्राधान्य
  •   रस्ता रुंदीकरणाची कामे
  •   कचरामुक्त प्रभाग
  •   पदपथांचे विकसन
  •  ज्येष्ठांसाठी विरंगुळा केंद्र