23 November 2020

News Flash

राष्ट्रपती राजशिष्टाचार उल्लंघन प्रकरणी महापालिकेकडून जावडेकरांकडे बोट

राजशिष्टाचाराचा भंग झाल्याबाबत जावडेकरांकडे महापालिकेने बोट दाखवले आहे.

पुणे : राष्ट्रपती रामनाथ कोविंद पुणे दौऱ्यावर असताना राजशिष्टाचाराचा भंग झाल्याप्रकरणी पुणे महानगरपालिके कडून जिल्हा प्रशासनाकडे लेखी खुलासा पाठविण्यात आला आहे. मात्र, लेखी खुलाशामध्ये केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या सांगण्यावरून नियोजित कार्यक्रमात नसतानाही आभार मानण्यात आल्याचे महापालिकेने म्हटले आहे. राजशिष्टाचाराचा भंग झाल्याबाबत जावडेकरांकडे महापालिकेने बोट दाखवले आहे.

महानगरपालिकेच्या मातोश्री रमाबाई आंबेडकर उद्यानातील रमाबाई आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण आणि साधू वासवानी इंटरनॅशनल स्कूलच्या उद्घाटन कार्यक्रमानिमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद ३० मे रोजी पुणे दौऱ्यावर आले होते. या कार्यक्रमात महापालिकेकडून राजशिष्टाचाराचा भंग झाला होता. त्यावर राष्ट्रपती कार्यालयाने जिल्हा प्रशासनाकडे विचारणा केली होती. जिल्हा प्रशासनाने याबाबत महापालिकेला नोटीस बजावून लेखी खुलासा मागवला होता. त्यावर महापालिकेने सादर केलेल्या खुलाशामध्ये केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सूचना केल्यामुळे कार्यक्रमात आभार प्रदर्शन करण्यात आले, असे नमूद करण्यात आले आहे.

पालिकेच्या कार्यक्रमात व्यासपीठावर कोण स्थानापन्न होणार हे राष्ट्रपती कार्यालयाकडून निश्चित करण्यात आले होते. मात्र, ऐनवेळी उपमहापौर सिद्धार्थ धेंडे यांना खुर्ची देण्यात आली. तसेच, नियोजित कार्यक्रमात आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम नसतानादेखील उपमहापौर धेंडे यांनी आभार मानले. तर, कार्यक्रम संपल्यानंतर राष्ट्रपतींबरोबर व्यासपीठाखाली छायाचित्र काढण्यात आल्याने राजशिष्टाचाराचा भंग झाला होता. त्यावर ऐनवेळी व्यासपीठावर खुर्ची देण्यात आल्यामुळे उपमहापौर तेथे स्थानापन्न झाले. तसेच केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आभार मानण्याची सूचना केल्यामुळे आभार मानण्यात आले, असे कारण महापालिकेकडून खुलाशामध्ये देण्यात आले आहे. कार्यक्रम सुरू झाल्यानंतर केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले उशिरा पोहोचले. त्याबाबत खुलासा करताना वाहतूक कोंडीमुळे त्यांना उशीर झाला, असे कारण पुढे करण्यात आले आहे.

चुका होणार नाहीत, याची दक्षता घ्या

महापालिकेकडून प्राप्त झालेला खुलासा जिल्हा प्रशासनाकडून राष्ट्रपती कार्यालयाकडे पाठविण्यात आला आहे. त्याबाबत राष्ट्रपती कार्यालयाकडून अद्याप उत्तर आलेले नाही. महापालिकेने पाठविलेल्या खुलाशात झालेल्या चुकांबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे. तर, अशा प्रकारच्या कोणत्याही चुका पुढे होणार नाहीत, याची दक्षता घेण्याबाबत महापालिकेला समज दिली असल्याचे जिल्हा प्रशासनाने राष्ट्रपती कार्यालयाला कळविले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 19, 2018 2:15 am

Web Title: pmc finger at prakash javadekar for protocol violation during president visit in pune
Next Stories
1 पिंपरीचे महापौर, तीन नगरसेविका लिफ्टमध्ये अडकल्या
2 कंडोमच्या सुरक्षित विघटनासाठी पहिले पाऊल..
3 अप्रशिक्षित आहारतज्ज्ञांचा सुळसुळाट
Just Now!
X