*  पुण्याचा पारा ३८. ७ * ’ राज्यात पुढील तीन ते चार दिवस तापमान चढेच राहणार

शहरात या हंगामातील सर्वोच्च तापमानाची नोंद मंगळवारी झाली. आद्र्रता वाढल्याने पुणेकर घामाघूम झाले. उत्तर भारतातून राज्याच्या दिशेने अतिउष्ण आणि कोरडे वारे वाहत आहेत. त्यामुळे पुढील तीन ते चार दिवस शहरातील तापमान चढे राहणार आहे. दरम्यान, राज्याच्या सर्व भागात मार्च महिन्यात शेवटच्या आठवडय़ात कमाल आणि किमान तापमानात वाढ होत असल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे. येत्या शनिवारी आणि रविवारी पूर्व विदर्भात उष्णतेची लाट येणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.

शहरात मंगळवारी ३८. ७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. सोमवारी पुण्यातील तापमानाचा पारा ३८. १ अंश सेल्सिअसवर पोहोचला होता.  राज्यातील सर्व भागात किमान व कमाल तापमानात वाढ झाली आहे. सर्वच ठिकाणी कमाल तापमानाचा पारा ३५ अंश सेल्सिअसच्या पुढे आहे. मुंबई, पुणे, नाशिक भागात सध्या उष्णतेची लाट जाणवत आहे. पुणे परिसरात मागील आठवडय़ात अवकाळी पाऊस झाला होता. त्यामुळे कमाल तापमानात घट झाली होती. रात्री आणि पहाटे थंडी पडत होती.  गेल्या मंगळवारी (२० मार्च) शहरात १७. ६ अंश सेल्सिअस तापमान नोंदविले गेले होते.

दरम्यान, मंगळवारी शहरात कमाल तापमानात आणखी वाढ झाली. आद्र्रता वाढल्याने पुणेकर घामाघूम झाले. त्यामुळे दुपारी शहरातील रस्त्यांवर वर्दळ कमी झाली होती.

भिरा येथे उच्चांकी तापमान

कोकण-गोवा विभागातील भिरा येथील तापमान सातत्याने वाढत आहे. मंगळवारी राज्यात भिरा येथे ४५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. भिरातील तापमान राज्यात उच्चांकी ठरले. अहमदनगर, जळगाव, मालेगाव, परभणी, अकोला, चंद्रपूर येथे कमाल तापमान ४० अंश सेल्सिअसच्या पुढे गेले आहे. दरम्यान, येत्या शनिवारी आणि रविवारी पूर्व विदर्भात उष्णतेची लाट येणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून नोंदविण्यात आला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भातील बहुतांश ठिकाणी मंगळवारी सरासरी कमाल तापमानापेक्षा पाच ते सहा अंश सेल्सिअस वाढ तापमानात झाली आहे. पुढील तीन ते चार दिवसांत तापमानात आणखी वाढ होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी, असे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे.