सोनसाखळी चोरांची नवी पद्धत; वारजे, भवानी पेठ, घोरपडे पेठ भागांत चोरीच्या घटना

गुन्हेगारांच्या कार्यपद्धतीवरून (मोडस ऑपरेंडी) पोलिसांकडून तपास केला जातो. किंबहुना प्रत्येक सराईताची गुन्हा करण्याची विशिष्ट अशी कार्यपद्धती असते. साधारणपणे दोन ते तीन वर्षांपूर्वी पुणे, मुंबई, ठाणे, नाशिक या शहरांत साखळीचोरटय़ांनी धुमाकूळ घातला होता. साखळीचोरीत पुणे, कल्याण तसेच नगर जिल्हय़ातील चोरटय़ांची टोळी तरबेज मानली जाते.पोलिसांकडून करण्यात आलेल्या उपाययोजनांमुळे साखळीचोरटय़ांना अटकाव घालण्यात गेल्या दोन वर्षांत यश आले असले, तरी पुणे शहरात आठवडाभरात घडलेल्या साखळीचोरीच्या गुन्हय़ांचे अवलोकन केल्यास चोरटय़ांनी साखळीचोरीचे गुन्हे करण्यासाठी मिरची पूड वापरण्यास सुरुवात केल्याचे उघडकीस आले आहे. वारजे, भवानी पेठ आणि घोरपडे पेठ भागात घडलेल्या गुन्हय़ांमध्ये चोरटय़ांनी नागरिकांच्या डोळय़ांत मिरची पूड फेकून लूटमार केल्याचे उघडकीस आले आहे.

मिरची पूड नागरिकांच्या डोळय़ांत फेकून लूटमार करण्याची चोरटय़ांची नवी ‘मोडस’ असल्याचे मानले जाते. काही वर्षांपूर्वी पादचारी महिलांना धक्का देऊन दुचाकीस्वार चोरटे दागिने हिसकावून पसार व्हायचे. मात्र, मिरची पूड टाकून दागिने हिसकावण्याची कार्यपद्धती पाहता शहरात चोरटय़ांच्या आणखी टोळय़ा सक्रिय झाल्याचे मानले जाते. एखाद्या व्यक्तीकडे मोठय़ा प्रमाणावर रोकड किंवा दागिने असल्यास सराईत चोरटे त्याचा डोळय़ांत मिरची पूड फेकून ऐवज लुटतात. साखळीचोरीच्या गुन्हय़ांमध्ये शक्यतो चोरटे मिरची पूड वापरत नाहीत, मात्र आठवडाभरात घडलेल्या गुन्हय़ांचे निरीक्षण केल्यास साखळीचोरटय़ांनी नागरिकांचे दागिने हिसकावण्यासाठी मिरची पूडचा वापर केल्याचे समोर आले आहे, अशी माहिती गुन्हे शाखेतील सूत्रांनी दिली.

गेल्या आठवडय़ापासून शहरात साखळीचोरटे सक्रिय झाले आहेत. कोथरूड, डहाणूकर कॉलनी, सिंहगड रस्ता, बिबवेवाडी भागात साखळीचोरटय़ांनी दागिने हिसकावण्याचे गुन्हे केले आहेत. गुन्हे शाखेकडून सराईत साखळीचोरटय़ांची माहिती घेण्यास सुरुवात केली आहे. अशा प्रकारचे गुन्हे करणाऱ्या चोरटय़ांच्या हालचालीवर गुन्हे शाखेकडून लक्ष ठेवण्यात आले आहे, अशी माहिती गुन्हे शाखेतील एका आधिकाऱ्याने दिली. साधारणपणे तीन ते चार वर्षांपूर्वी पुणे, मुंबई, ठाणे, नाशिक शहरात साखळीचोरटय़ांनी धुमाकूळ घातला होता. साखळीचोरीचे गुन्हे करण्यात तरबेज असलेल्या चोरटय़ांना पोलिसांनी पकडले. त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत (मोक्का) कारवाई केली. राज्यभरातील पोलिसांनी साखळीचोरटय़ांना अटकाव घालण्यासाठी एक व्हॉट्सअ‍ॅप समूह तयार केला. त्या माध्यमातून राज्यातील विविध शहरांत सक्रिय असलेल्या चोरटय़ांची माहिती देण्यात आली, त्यामुळे साखळीचोरीच्या गुन्हय़ांमध्ये लक्षणीय घट झाली.

मिरची पूड टाकून दागिने हिसकावण्याचे गुन्हे

  • २४ नोव्हेंबर- वारजे भागात सेवानिवृत्त बँक कर्मचारी विनायक हरी बर्वे (वय ५४, रा. गंगापूर रस्ता, नाशिक) यांच्या डोळय़ांत मिरची पूड टाकून २५ हजाराची सोनसाखळी हिसकावली.
  • २५ नोव्हेंबर- घोरपडे पेठेतील मनमोहन पार्क सोसायटीच्या आवारात योगेश ओसवाल (वय ४०) यांच्या डोळय़ांत मिरची पूड फेकून तीस हजाराची रोकड आणि मोबाइल व्हाऊचर्स असा ७० हजाराचा माल लुटला.
  • २६ नोव्हेंबर- भवानी पेठेत सोसायटीच्या आवारात ज्येष्ठ महिलेच्या डोळय़ांत मिरची पूड फेकून ६५ हजाराचे दागिने हिसकावले.