राज्याच्या विविध भागासह पुणे शहर आणि परिसरामध्ये कमाल तापमानाचा पारा वाढला आहे. रविवारी शहरात ३८.६ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदविले गेले. तापमानाचा हा पारा येत्या दोन ते तीन दिवसांत आणखी वाढणार असल्याची शक्यता पुणे वेधशाळेकडून व्यक्त करण्यात आली आहे.

उत्तर भारतातून शहराच्या दिशेने येणारे अतिउष्ण आणि कोरडे वारे, अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरावरून राज्याच्या दिशेने येणा?ऱ्या उष्ण वा?ऱ्यांमुळे पुण्यासह राज्यातील तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे. पुणे शहर आणि परिसरामध्ये मागील आठवडय़ापासून तापमानाचा पारा वाढला आहे. त्यामुळे चांगलाच उकाडा जाणवतो आहे.

रविवारी कमाल तापमान ३८.६ अंशांवर कायम राहिल्याने उकाडा कमी होऊ शकला नाही. दुपारी उन्हाच्या तीव्र झळा जाणवत होत्या. रविवारी सकाळपासूनच आकाश मुख्यत: निरभ्र असल्याने उकाडय़ात वाढ झाली. सुटीचा दिवस असल्याने अनेकांनी दुपारी बाहेर जाणे टाळले.दरम्यान, विदर्भात उष्णतेची लाट कायम असून, बहुतांशी भागातले कमाल तापमान ४० अंशांच्या पुढे सरकले आहे. रविवारी ब्रह्मपुरी येथे उच्चांकी ४४.३ तर नाशिकमध्ये नीचांकी १९.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. राज्यात मंगळवापर्यंत राज्यात कोरडे हवामान राहणार आहे. तर २६ एप्रिलपर्यंत विदर्भात उष्णतेची लाट कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.