पुणे : अकरावी प्रवेशाच्या पहिल्या निवड यादीसाठी विद्यार्थी, पालकांना आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे. ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील पहिल्या फेरीची निवड यादी तांत्रिक अडचणींमुळे गुरुवारीही (२६ जून) जाहीर झाली नाही. त्यामुळे आता प्रवेश प्रक्रियेचे आणखी एक सुधारित वेळापत्रक जाहीर करण्याची वेळ शिक्षण विभागावर आली असून, नव्या वेळापत्रकानुसार आता पहिल्या फेरीची निवड यादी ३० जूनला जाहीर करण्यात येणार आहे.
यंदा अकरावीची प्रवेश प्रक्रिया केंद्रीभूत पद्धतीने प्रथमच राज्य पातळीवर राबवण्यात येत आहे. प्रवेशासाठीच्या संकेस्थळावरील माहितीनुसार राज्यातील ९ हजार ४३५ कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये २१ लाख २३ हजार ७२० जागा उपलब्ध आहेत. त्यात १६ लाख ६० हजार ८४ जागा कोटा प्रवेशासाठी, तर ४ लाख ६३ हजार ६३६ जागा कोटा प्रवेशासाठी आहेत. प्रवेशासाठी १२ लाख ७१ हजार २०१ विद्यार्थ्यांनी अर्ज केला आहे. कोट्यातून ६० हजार ४८७ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत.
माध्यमिक शिक्षण संचालनालयाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार पहिल्या फेरीची निवड यादी गुरुवारी जाहीर करण्यात येणार होती. तसेच, २७ जून ते ३ जुलै या कालावधीत प्रवेश जाहीर झालेल्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रवेश निश्चित करता येणार होता. मात्र, तांत्रिक अडचणींमुळे निवडयादी जाहीर करता आली नाही.
आता माध्यमिक शिक्षण संचालनालयाने जाहीर केलेल्या सुधारित वेळापत्रकानुसार पहिल्या फेरीची निवडयादी ३० जूनला जाहीर करण्यात येणार आहे. तर प्रवेश जाहीर झालेल्या विद्यार्थ्यांना १ ते ७ जुलै या कालावधीत प्रवेश निश्चित करता येणार आहे. दुसऱ्या फेरीसाठीच्या रिक्त जागा ९ जुलैला प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत अल्पसंख्यांक शाळा-महाविद्यालयातील एकूण प्रवेश क्षमतेतील प्रवेशाबाबत फेरबदल करणे अपेक्षित आहे. तसेच, काही तांत्रिक अडचणींमुळे गुरुवारी गुणवत्तेनुसार विद्यार्थ्यांची निवडयादी जाहीर करता आली नाही. आता संगणक प्रणालीमध्ये फेरबदल करून पारदर्शक व निकोप पद्धतीने प्रवेश प्रक्रिया होण्यासाठी सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. – डॉ. महेश पालकर, माध्यमिक शिक्षण संचालक.
यंदा अकरावी प्रवेश प्रक्रियेचा खेळखंडोबा झाला आहे. निकाल जाहीर होऊन महिना झाला, तरी अकरावी प्रवेशाचा पत्ता नाही. शिक्षण विभाग १२ लाख विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान करत आहे. या विरोधात पालक, विद्यार्थ्यांनी आवाज उठवला पाहिजे. – राजेंद्र धारणकर, सिस्कॉम संस्था.
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.