पुणे : राज्यात अनेक भागांत डोळे येण्याची साथ मोठ्या प्रमाणात सुरू आहे. राज्यभरात ११ ऑगस्टपर्यंत रुग्णसंख्या सुमारे चार लाखांवर पोहोचली आहे. सर्वाधिक रुग्णंसख्या बुलढाण्यात असून, त्यानंतर पुणे, जळगाव, नांदेड आणि चंद्रपूरमध्ये प्रमाण जास्त आहे. विशेष म्हणजे, मागील आठ दिवसांत रुग्णसंख्येत तब्बल दोन लाखांहून अधिक वाढ नोंदविण्यात आली आहे.

मागील काही दिवसांपासून राज्यातील डोळे येण्याच्या साथीचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून रुग्णसंख्येत मोठी वाढ सुरू झाली. ही वाढ दिवसेंदिवस आणखी वाढताना दिसत आहे. राज्यात ३ ऑगस्टला रुग्णसंख्या १ लाख ८७ हजार होती. ती ११ ऑगस्टपर्यंत वाढून ३ लाख ९९ हजार ६०५ वर पोहोचली आहे. म्हणजेच आठ दिवसांत रुग्णसंख्या दोन लाखांहून अधिक वाढली आहे.

हेही वाचा >>> मेट्रोचा प्रवास सहजसोपा! ‘एक पुणे कार्ड’चा पुण्यासह देशभरात कुठेही वापर शक्य

राज्यात ११ ऑगस्टपर्यंत डोळे येण्याचे सर्वाधिक ४४ हजार ३९८ रुग्ण बुलढाणा जिल्ह्यात आढळले आहेत. त्याखालोखाल पुणे जिल्ह्यामध्ये ३२ हजार ४६२, जळगाव २५ हजार ७०९, नांदेड २२ हजार ८६० आणि चंद्रपूर १७ हजार ८५१ अशी रुग्णसंख्या आहे. पुणे महापालिकेच्या हद्दीत ८ हजार ३५७ रुग्ण आढळले असून, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीत ६ हजार ७२१ रुग्ण सापडले आहेत. मुंबईतील रुग्णसंख्या ३ हजार ४९० आहे.

काळजी काय घ्यावी?

राज्यातील अनेक भागांत ‘डोळे येणे’ या आजाराच्या रुग्णसंख्येमध्ये वाढ होताना दिसत आहे. डोळे येणे हा आजार मुख्यत्वे ॲडिनो विषाणूमुळे होतो. हा सौम्य प्रकारचा संसर्ग आहे. साधारणपणे डोळा लाल होणे, वारंवार पाणी गळणे, डोळ्याला सूज येणे अशी लक्षणे आढळतात. डोळे आलेल्या व्यक्तींनी स्वत:चे घरामध्ये विलगीकरण करणे गरजेचे आहे. आजाराचा संसर्ग एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला वेगाने होतो. त्यामुळे हा आजार होऊ नये म्हणून वारंवार हात धुणे, वैयक्तिक स्वच्छता ठेवणे आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य उपचार घेणे, डोळ्यांना हात न लावून या आजाराला प्रतिबंध करावा, असे आरोग्य विभागाने म्हटले आहे.

हेही वाचा >>> स्वातंत्र्यदिनी राज्यातील १८६ कैद्यांची होणार सुटका

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आरोग्य विभागाकडून उपाययोजना काय? आरोग्य विभागामार्फत प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून डोळे येण्याची साथ सुरू असलेल्या भागात आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत घरोघरी सर्वेक्षण करण्यात येत आहे. साथ असलेल्या भागात शाळेतील मुलांची डोळ्याची तपासणी करून उपचार करण्यात येत आहेत. सर्व आरोग्य संस्थांमध्ये आजाराच्या उपचारासाठी लागणारी आवश्यक औषधे उपलब्ध करण्यात आले आहे, अशी माहिती आरोग्य सेवा उपसंचालक डॉ. कैलास बाविस्कर यांनी दिली.