बारामती : बारामती शहरात वाहतूक शाखेने वाहनांचा काळ्या काचा लावलेल्या वाहनांविरोधात मोहीम राबविली असून, १५ दिवसांत १५२ चारचाकी वाहनांवर कारवाई करून ९ लाख ७५ हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे. या कारवाईत काही तडीपार गुंड आणि गंभीर गुन्हे असलेल्या आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले.
वाहनांना लावलेल्या काळ्या काचा काढण्याचे आवाहन पोलिसांनी केले होते. त्यानंतरही काळ्या काचा न काढलेल्या वाहनांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात येत असून, शहरातील विविध चौकांमध्ये तपासणी सुरू आहे. कोर्ट कॉर्नर चौक, कसबा चौक परिसरात गेल्या दोन दिवसांपासून तपासणी अधिक तीव्र करण्यात आली आहे. काळ्या काचा असलेल्या वाहनांबराेबरच वेगवेगळ्या आकाराच्या वाहन क्रमांक पाट्या असणाऱ्या वाहनचालकांवरही कारवाई करण्यात आली.
काळ्या काचा लावलेल्या वाहनांचा वापर अनेकदा गुन्हे करण्यासाठी केला जातो. त्यामुळे ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. गाडीच्या काचा काळ्या असतील किंवा एखाद्या वाहनाबाबत शंका निर्माण झाल्यास पोलिसांशी संपर्क साधावा.- चंद्रशेखर यादव, पोलीस निरीक्षक, बारामती</strong>