पुणे : नोंदणी व मुद्रांक विभागातील कर्मचारी गेल्या आठवड्यात संपात सहभागी झाले होते. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील दस्तनोंदणीला त्याचा मोठा फटका बसला होता. संप काळात एका दिवसात फक्त ३५५ दस्त नोंदविण्यात आले होते. त्यातून केवळ दहा कोटींचा महसूल मिळाला होता. आता नोंदणी विभागाचे कामकाज सुरुळीत झाले असून गुरुवारी पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात मिळून एकूण १३५० दस्त नोंदविले असून ७१ कोटी २६ लाख रुपयांचा महसूल शासनाला मिळाला आहे.

हेही वाचा – अपघात रोखण्यासाठी सरकारने आणली स्वतंत्र योजना; रस्ता सुरक्षेसाठी निधी राखीव ठेवणार, आरटीओकडे नियोजनाची जबाबदारी

हेही वाचा – पुणे रेल्वे स्थानकावर आता प्रवाशांना विश्रांतीसाठी कक्ष

राज्य शासनाला महसूल मिळवून देणारा नोंदणी व मुद्रांक विभाग हा दुसऱ्या क्रमांकाचा विभाग आहे. पुणे पिंपरी चिंचवड शहरात एकूण २७ दुय्यम निबंधक कार्यालये आहेत. चालू बाजार मूल्यदराचे (रेडीरेकनर) नवे दर १ एप्रिलपासून लागू होतात. त्यामुळे दरवर्षी मार्च महिन्यात सर्वाधिक दस्तनोंदणी होते. तसेच सर्वाधिक महसूलही मार्च महिन्यातच जमा होतो. जमीन, सदनिका, दुकाने आदींच्या दस्त नोंदणीसाठी दुय्यम निबंधक कार्यालयात पक्षकारांची गर्दी होताना दिसत आहे. जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करावी, या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी संप केल्याने १४ ते २० मार्च या काळात दस्त नोंदणीची कार्यालये बंद होती. आता स्थिती पूर्ववत झाली असून मार्च अखेरपर्यंत व्यवहार पूर्ण करण्यासाठी नागरिकांची लगबग सुरू आहे.