नारायणगाव : नाशिक येथे २०२७ मध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आंबेगाव तालुक्यातील श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे भाविक भक्तांसाठी उभारण्यात येणाऱ्या सुविधांसाठी २८८.७१ कोटींच्या विकास आराखड्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील समितीने मान्यता दिली. या आराखड्यानुसार भीमाशंकर येथे लवकरच हेलिपॅडची सुविधा उपलब्ध होणार आहे.
मुंबई येथे झालेल्या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार, सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार, माजी मंत्री दिलीप वळसे पाटील, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, मुख्यमंत्री कार्यालयाच्या प्रधान सचिव अश्विनी भिडे, सचिव डॉ. श्रीकर परदेशी, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी आदी उपस्थित होते.
या बैठकीत जिल्हाधिकारी डुडी यांनी सादर केलेल्या आराखड्याला मंजुरी देण्यात आली. या आराखड्यानुसार हेलिपॅडची सुविधा उपलब्ध होणार आहे. तसेच, मंदिर परिसरात वाहनतळ, शौचालयाची सुविधा मिळणार आहे. ‘निगडाळे येथे भाविक सुविधा केंद्र आणि वाहनतळासाठी १६३ कोटी, मंदिर परिसर विकासासाठी ९० कोटी आणि राजगुरुनगरकडील मार्ग, श्री कोटेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार यासाठी ३३ कोटी रुपये तरतूद करण्यात आली आहे.
वाहनतळावर २००० चारचाकी वाहने, २०० मिनी बस, ५ हजार दुचाकी वाहने उभी करता येणार आहेत. भाविकांसाठी प्रतीक्षा कक्ष, स्नानगृह, शौचालय, लॉकर, दुकाने या सुविधा असतील. भीमाशंकर बस स्थानक आणि ज्योतिर्लिंग मंदिर परिसर यामध्ये बस स्थानकाचा पुनर्विकास, राम मंदिर आणि दत्त मंदिर पुनर्बांधणी, दिव्यांगांसाठी इलेक्ट्रिक वाहन दिल्या जाणार आहेत. राजगुरुनगरकडून नवीन मार्ग आणि श्री कोटेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार, ट्रेकिंग वॉकिंग इत्यादी कामे केली जाणार आहेत,’ असे वळसे यांनी स्पष्ट केले.