पुणे : केंद्र सरकारच्या सहकार्याने अलीकडे ग्रंथ प्रदर्शने भरविली जातात. उत्सुकता म्हणून मी देखील या ग्रंथ प्रदर्शनाला भेट दिली तेव्हा प्रकर्षाने असे जाणवले की या ग्रंथ प्रदर्शनामध्ये हिंदुत्ववादी विचारसरणी, गोळवलकर गुरुजींचे साहित्य प्राधान्याने दिसते. मात्र, आंबेडकरवादी किंवा समतावादी चळवळीतल्या साहित्याला त्या ठिकाणी स्थान नसते, ही खेदाची गोष्ट आहे, अशा शब्दात ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी नाराजी व्यक्त केली.
माजी आमदार जयदेव गायकवाड यांच्या पुढाकारातून स्थापन करण्यात आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सोशल रिसर्च सेंटरचे उद्घाटन पवार यांच्या हस्ते झाले. सत्यशोधक समाज स्थापना दिनाचे औचित्य साधून बालगंधर्व रंगमंदिरात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी ज्येष्ठ विचारवंत बाबा आढाव, खासदार निलेश लंके, माजी आमदार उल्हास पवार, ज्येष्ठ विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे, राजकीय अभ्यासक डॉ. सुहास पळशीकर, ॲड शारदा वाडेकर, ज्येष्ठ पत्रकार अरुण खोरे, लक्ष्मण माने, आदी उपस्थित होते. ‘भारतीय संविधान: संसदीय लोकशाहीपुढील आव्हाने’ या विषयावर झालेल्या परिसंवादात मान्यवरांनी विचार मांडले.
पवार म्हणाले, ” डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने सामाजिक संशोधन केंद्राचे उद्घाटन होतेय, ही सकारात्मक गोष्ट आहे. देशात काही चुकीच्या गोष्टी घडत आहेत, पण तरीही संविधानाचा पाया भक्कम असल्याने संसदीय साधनांचा आधार घेऊन भूमिका मांडण्याचा अधिकार आपल्याला आहे. याच संविधानामुळे भारत एकसंध आहे.”
“देशापुढील आव्हाने हळूहळू गंभीर होत आहे. अनेक विचारांचे, भूमिकांचे लोक संसदेत आहेत. कधीकधी चिंता वाटावी, असे चित्र दिसते. निर्णय घेण्याचे व्यासपीठ बाजूला ठेवून निर्णय घेतले जातात. परंतु, संविधानाच्या चौकटीबाहेर जाता येत नसल्याने अनेकदा त्यांचा भ्रमनिरास होतो. देशातील प्रत्येक समस्येवर संविधानात उत्तर आहे.
“भारताच्या शेजारील पाकिस्तान, श्रीलंका, नेपाळ, बांगलादेश या देशांमध्ये अस्थिरतेचे वातावरण आहे. अशावेळी भारत मात्र एकसंध व प्रगतीच्या पथावर आहे. देशाला एकसंध ठेवण्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले संविधान व त्यातील लोकशाही मूल्ये महत्वाचे योगदान देत आहेत,”
संविधानाचा व्यापक अर्थ, महत्व जनसामान्यांपर्यंत पोहोचण्यासाठी संस्थात्मक काम उभारणे गरजेचे आहे. आज स्थापन झालेल्या केंद्रामुळे हे काम होईल. समतेचा पुरस्कार करणारे लिखाण व्हावे, या विचारांचा प्रसार व्हावा, संविधानाच्या विचारांवर चालणाऱ्या व्यक्तींना शोधून त्यांना प्रोत्साहित करावे आणि बाबासाहेबांचे विचार, संविधानाची मूल्ये जनमानसात पोहोचवण्याचे काम करावे,” असे आवाहन पवार यांनी केले.