पुणे : कार्यालयीन वेळेत भ्रमणध्वनीच्या (मोबाईल) अतिवापरामुळे कामकाजावर परिणाम होत असल्याने पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडील (पीएमआरडीए) कंत्राटी पद्धतीने नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांना मोबाईल वापरण्यास मनाई करण्यात आली आहे. पीएमआरडीएचे महानगर आयुक्त डाॅ. योगेश म्हसे यांनी त्याबाबतचे आदेश काढले आहेत. त्यानुसार कंत्राटी कामगार नियुक्त केलेल्या बाह्यस्त्रोत यंत्रणेने या निर्णयाची अंमलबजावणी सुरू केली आहे.

पीएमआरडीएला ४०७ पदांचा आकृतीबंध मंजूर झाला आहे. या मंजूर आकृतीबंधामधील प्रतिनियुक्तीसह आस्थापनेवरील मोठ्या प्रमाणावर रिक्त पदे आहेत. प्रतिनियुक्तीची पदे शासनाकडून उपलब्ध होईपर्यंत तसेच सरळसेवा पदांची बिंदू नियमावली मंजूर होऊन ही पदे एमपीएससी किंवा जिल्हा निवड समितीमार्फत भरती करण्यास अद्यापही काही कालावधी अपेक्षित आहे. त्यामुळे ही पदभरती होईपर्यंत पीएमआरडीएने बाह्यस्त्रोत यंत्रणा नियुक्त करून त्यांच्या मार्फत कंत्राटी मनुष्यबळ उपलब्ध करून घेतले होते.

हेही वाचा – पिंपरी : मतमोजणीनिमित्त उद्या ‘या’ भागातील वाहतुकीत बदल

हेही वाचा – कोथरूडमध्ये चंद्रकांत पाटील यांच्या मताधिक्याची चर्चा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बाह्यस्त्रोत यंत्रणेमार्फत नियुक्त केलेल्या या कंत्राटी कामगारांकडून कार्यालयीन वेळेत मोबाईलचा अतिवापर होत असल्याचे निदर्शनास आले होते. त्याचा परिणाम पीएमआरडीएच्या कामकाजावरही होत होता. मोबाईलचा मोठ्या प्रमाणावर वापर होत असल्याने गोपनियतेचा भंग होण्याचा धोकाही निर्माण झाला होता. त्यामुळे कंत्राटी कामगारांना मोबाईल वापरण्यास बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे संबंधित कर्मचारी पूर्णवेळ कामकाजात व्यस्त राहतील आणि कामकाजात सुरळीतपणा येईल, असा दावा पीएमआरडीए प्रशासनाकडून करण्यात आला आहे. दरम्यान, कंत्राटी कामगार वगळता पीएमआरडीएचे अन्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मोबाईलचा वापर करता येणार आहे, असेही पीएमआरडीए प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.